कोकणातील सुप्रसिद्ध गणपती
गणेशोत्सवात आपण अष्टविनायाव्यतिरीक्त राज्यात प्रसिद्ध झालेल्या गणपतींची माहिती घेत आहोत. याच अंतर्गत आज आपण कोकणातील सुप्रसिद्ध गणपतींची माहिती घेणार आहोत.
हेदवीचा दशभुजा गणपती!
कोकण आणि श्री गणेशाचे खास नाते आहे असं म्हणता येईल. गुहागरकडून तवसाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर म्हणजेच सागरी महामार्गावर हेदवी गावा नंतर दगडी बांधकाम केलेलं गणेश मंदिर दिसतं. ते म्हणजे हेदवीचे दशभुज गणेश मंदिर. हे मंदिर पेशवेकालीन असावे आणि माधवराव पेशव्यांच्या काळात ते बांधले गेले असावे असा अंदाज आहे.
केळकर स्वामी नामक गणेशभक्त गृहस्थांनी पेशव्यांच्या कृपेने हे मंदिर उभारले आणि उर्वरित रकमेत हरेश्वराचे मंदिर गावात बांधले. सभामंडपात जय-विजय द्वारपाल रूपात दिसतात तिथेच केळकर स्वामींच्या पादुकाही आहेत. मंदिरासमोर अतिशय सुंदर अशी दगडी दीपमाळ आहे. या मंदिरातील गणेश मूर्ती दहा हातांची आहे म्हणूनच या गणपतीला दशभुज गणेश म्हंटलं जातं. चक्र, त्रिशूल, धनुष्य, गदा, आशीर्वाद देणाऱ्या हातात महाळुंग फळ, कमळ, पाश, नीलकमळ, दात आणि धान्याची लोंबी अशा गोष्टी हातांत दिसतात.
मूर्ती संगमरवरी दगडाची असून, डाव्या सोंडेची आहे. गणपतीच्या सोंडेत अमृतकलश घेतलेला आहे. गळ्यात नागाचे जानवे असल्याचे पाहायला मिळते. दशभुज गणेश मूर्ती सगळीकडे आढळत नाही. या मूर्तीची निर्मिती काश्मीर मधील पाषाण वापरून केली गेली आहे असं सांगितलं जातं. रत्नागिरी जिल्ह्यातील हेदवी गावातील दशभुज गणपती हे जागृत देवस्थान आहे. चिपळूण गावापासून १० कि.मी. अंतरावर हेदवी या गावी हे मंदिर आहे.
रेडी येथील व्दिभूज गणपती
रेडी येथील व्दिभूज गणपती देवस्थान आता सिंधुदुर्गातील प्रमूख धार्मिक पर्यटनस्थळांपैकी एक बनले आहे. येथील वैशिष्ट्यपूर्ण गणपतीची मूर्ती उत्खननात सापडली आहे. या देवस्थानला मानणार्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रेडी हे वेंगुर्ले तालुक्यातील देखणे गाव. माडा, पोफळींच्या बागा, निळाशार समुद्र किनारा आणि प्राचीन मंदिरांमुळे या गावाला एक वेगळी ओळख मिळाली आहे.
यशवंत गडाच्या रूपाने या गावाला ऐतिहासीक वारसाही लाभला आहे. या गावचे पूर्वीचे नाव रेवतीव्दिप, रेवतीपट्टण किंवा रेवतीनगर असे होते. तेराव्या शतकात सलेश्वर राजाची ही राजधानी होती. या काळात नागपंथी सांप्रदायाची सुरूवात झाली. या सांप्रदायातील सिध्दपुरूषांच्या सिध्द विध्येने राजा सत्तेश्वर भयभीत झाला. यातून संघर्ष होवून रेवतीनगर लयाला गेले अशी अख्ख्यायीका सांगितली जाते. येथे प्राचीन काळापासून श्री देवी माऊली (आदीमाया) हे स्वयंभू रामदैवत आहे. या शिवाय इतरही मंदिरे आहेत.
व्दिभूजा गणपतीचे मंदिर मात्र अलिकडच्या काळातील आहे. साधारण 50-60 वर्षांपासून येथे खाण व्यवसाय सुरू आहे. या काळात खाणीवरून खनीज मालाची ट्रकमधून ने-आण चालायची. रेडी-नागोळावाडी येथील सदानंद नागेश कांबळी हे एप्रिल 1976 मध्ये ट्रकमधून खनीज माल नेत होते. आता मंदिर असलेल्या परिसरात आले असता त्यांना झोप आली. यावेळी गणपती त्यांच्या स्वप्नात आला व आपण जमिनीखाली असल्याचा साक्षात्कार करून दिला. कांबळी यांनी ग्रामस्थांना ही बाब सांगितली. यानंतर ग्रामदैवताला कौल लावून खोदकाम सुरू करण्यात आले. यावेळी गणपतीची जांभा दगडात कोरलेली देखणी आणि भव्य मूर्ती सापडली. यानंतर महिन्याभरांनी गणपतीचे वाहन असलेल्या उंदराचीही मूर्ती सापडली.
गुहागरचा उफराटा गणपती!
चिपळूण हे गोवा मार्गावरचं महत्त्वाचं शहर. तिथूनच गुहागरला जायला फाटा फुटतो. साधारण पन्नास किलोमीटरवर असणारा इथला समुद्र किनारा आताशा चांगलाच अनेकांच्या परिचयाचा झालाय. कोकण म्हणजे नारळाची वाडी, आमराई हे सगळं आलंच की हो.. अशाच खाशा कोकणातल्या गुहागर या ठिकाणी आहे उफराटा गणपती. !!
या गणपतीची कथा अशी सांगितली जाते की हा कोळ्यांना समुद्रात सापडला. त्यांनी ती मूर्ती समुद्रातून आणून विधीपूर्वक त्याची स्थापना छोट्या मंदिरात केली. पण पुढे गावात समुद्राचं पाणी शिरलं आणि चक्क गावच बुडण्याची वेळ आली. कोळ्यांनी आणि लोकांनी साहजिकच या पूर्वभिमुख गणपतीची आराधना संकटनिवरणासाठी केली. ” संकटी पावावे” यासाठी प्रसिद्ध असलेला गणराया प्रसन्न झाला आणि त्याने पश्चिमेला तोंड वळवून कटाक्ष टाकला. यामुळे समुद्राने माघार घेतली आणि गावावरचं संकट टळलं. तेव्हापासून विघ्नहर्ता उफराटा गणपती नावाने तो ओळखला जाऊ लागला.
कशी आहे ही उफारट्या गणपतीची मूर्ती ??
डाव्या सोंडेची, पांढर्या शुभ्र दगडाची, गळ्यात नाग-पुतळ्या, चार हातात मोदक, त्रिशूल, कमलपुष्प, परशु असलेली ही मूर्ती आकर्षक आहे. विशेष म्हणजे या मूर्तीला मुकुटच नाहीय. असं असूनही मूर्ती खूपच रेखीव आहे आणि कोळी समाजाची या गणपतीवर मोठी श्रद्धा आहे. मूर्ती एकदंती आहे. अर्थातच सुपासारखे कान आणि पायात मोठे वाळे असलेली आहे. निसर्ग सौन्दर्याने नटलेल्या या गावात आताशा बर्याच सुविधा आहेत. संस्थेचं सुसज्ज निवासस्थान आहे.
आंजर्ले येथील `कड्यावरचा गणपती’
आंजर्ले गाव हे दापोलीहून केळशीकडे जाताना साधारण १८ किमी अंतरावर आहे. गावात प्रवेश करण्यापूर्वी उजवीकडे टेकडीवर असलेलं श्रीगणेशाचे जागृत देवस्थान `कड्यावरचा गणपती’ म्हणून प्रसिध्द आहे. निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या मंदिराकडे जाणारा रस्ता दाट झाडीतून जातो व टेकडीवरील मंदिरापर्यंत वाहनांसाठी थेट रस्ता आहे. मंदिराची स्थापना सहाशे वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. १४३० च्या सुमारास केली असावी असे मानण्यात येते. गाभाऱ्यातील गणेश मूर्ती ५ फूट उंचीची सिंहासनाधिष्ठित आहे. मूर्तीच्या शेजारी रिद्धीसिद्धी यांच्या सुबक आकृत्या कोरलेल्या आहेत. ही मूर्ती दाभोळच्या पठारवाटांनी घडविल्याचे वरिष्ठ नागरिक सांगतात. गणपतीच्या सोंडेत अमृतकलश घेतलेला आहे. गळ्यात नागाचे जानवे असल्याचे पाहायला मिळते.
मंदिराचे पूर्वीचे बांधकाम लाकडी होते व मंदिराचा इ.स. १७८० मध्ये जीर्णोध्दार करण्यात आल्यानंतर सध्याचे मंदिर उभे राहिले आहे. हे मंदिर पेशवेकालीन वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे. मंदिराच्या आसपासचा परिसर देखणा आहे ! जीर्णोद्धार करताना काळ्या दगडावर गिलावा देऊन संगमरवरासारखे शुभ्र मंदिर उभारले आहे. आवार विस्तीर्ण असून मध्यभागी गणपती व त्या शेजारी शंकराचे मंदिर आहे. गणपती मंदिरासमोर सुदर्शन तलाव आहे. इ. स. १९८० मध्ये मंदिराचा द्विशताब्दी महोत्सव संपन्न झाला.
साधारणपणे ६५ फूट उंच असलेले हे देवालय ५० फूट x ४० फूट क्षेत्रफळाचे आहे. विशेष म्हणजे याची स्थापत्य शैली कालानुरूप मिश्र स्वरूपाची आहे. मध्ययुगीन व अर्वाचीन स्थापत्यकलेचा प्रभाव स्पष्टपणे आढळतो. मंदिरात पुरुषभर उंचीचा दगडी तट आहे. एकूण १६ कळस असणाऱ्या मंदिराचे १६ उपकलश गर्भगृहाच्या वर आहेत. कळसावर अष्टविनायकाच्या प्रतिमा आहेत. सभागृह, अंतराळ व गर्भगृह अशी रचना असणाऱ्या या मंदिराच्या एका गोपुराची उंची ४० फूट तर दुसरे गोपुर ६० फूट उंचीवर आहे. सभागृहाला ८ कमानी आणि घुमटाकृती छत आहे. सर्व घुमटांच्या टोकाशी कमलपुष्पे आहेत. मंदिरासमोरील तळ्याशेजारी पुरातन बकुळवृक्ष आढळतात. माघी गणेशोत्सव हा येथील महत्वाचा गणेशोत्सव असतो. सुवर्ण दुर्ग या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या किल्ल्यासमोरच गजाननाचे हे स्थान आहे.
(छायाचित्र सौजन्य विकिपीडिया)