गणेशोत्सव विशेष
नाशिक श्रीगणेश
श्री विघ्नहरण गणेश देवस्थान
(डि.जी.पी.नगर क्रमांक १)
इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉमच्या या गणेशोत्सव विशेष लेखमालेत आज आपण डी.जी.पी.नगर क्रमांक-१ येथील श्री विघ्नहरण गणेश देवस्थानाची माहिती पाहणार आहोत.
नाशिक-पुणे महामार्गांवर असलेल्या डी.जी.पी.नगर क्रमांक -१ वसाहतीमधील श्री विघ्नहरण गणेश देवस्थान या परिसरात प्रसिद्ध आहे.
इ.स. १९७६-७७ मध्ये नाशिक मध्ये डीजीपी नगर वसाहतीची स्थापना झाली. त्यावेळी या सर्व परिसरांत सर्वत्र शेतं होती. त्यावेळी या शेतांमध्ये ५ फूट बाय ५ फूट आकाराचे वीटांचे एक लहानसे गणपती मंदिर होते.या ठिकाणी रहायला आलेल्या डीजीपी नगर क्रमांक -१ मधील रहिवाशांना आपल्या परिसरांत छानसे गणपती मंदिर असावे असे वाटत होते परंतु तो योग सुमारे २१ वर्षांनी आला.
१९९७ मध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प.पू. श्री गणेशबाबा महाराज यांच्या शुभहस्ते मंदिराच्या जागेचे विधिवत भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर सुमारे चार वर्षांनी आषाढ शुद्ध १२ सोमवार दिनांक २ जुलै २००१ रोजी या ठिकाणी बांधण्यात आलेल्या या भव्य मंदिरात श्री विघ्नहरण गणेशाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. डी.जी.पी. नगर क्रमांक -१ येथील श्री विघ्नहरण गणेश देवस्थान अतिशय प्रशस्त जागेवर बांधलेले असून मंदिराचा अष्टकोनी गाभारा १६ फूट बाय १६ फूट आकाराचा असून त्याला साजेसा भव्य सभामंडप आहे. या मंडपात दररोज महिला मंडळाचे हरिपाठ होतात.
या मंदिरात श्री गणेशाची नित्यपूजा व सकाळ संध्याकाळ आरती केली जाते. संकष्टी चतुर्थी, गणेश जयंती, गणेशोत्सव हे उत्सव उत्साहाने साजरे केले जातात. डीजीपी नगर क्रमांक -१ च्या परिसरांतून निरामय जेष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून दर महिन्याच्या १८ तारखेला सिव्हील हॉस्पिटल मधील पेशंटस सोबत येणाऱ्या नातेवाइकांना जेवणाचे ७० ते ८० डबे नियमितपणे पोहचविले जातात. वर्धापन दिनानिमित्त पूर्वी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाई.
या गणेशाचे वैशिष्ट्य म्हणजे विवाहोत्सुक तरूण तरूणी या गणेशाला ११ मंगळवारी फुलांची मंडुळी (मुंडावळी) अर्पण करतात. या गणेशाचे वैशिष्ट्य म्हणजे ११ मंगळवार पूर्ण होण्यापूर्वीच विवाहोत्सुक तरूणांना अनुरूप जोडिदार मिळतात आणि त्यांचे विवाह जुळतात असे अनेक अनुभव सांगितले जातात. नाशिकचे माजी महापौर सतिश कुलकर्णी हे या देवस्थानाचे अध्यक्ष असून श्री बापूसाहेब कुलकर्णी कार्याध्यक्ष आहेत. श्री महेश कुलकर्णी हे या मंदिराचे मुख्य पुजारी आहेत. डीजीपी नगर क्रमांक १ येथील हा गणपती अनेकांच्या मनोकामना पूर्ण करतो. त्यामुळे भक्तांमध्ये या विघ्नहरण गणेशाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
Ganeshotsav Special Article Vighnaharan Temple DGP Nagar by Vijay Golesar
Nashik Ganesh Festival