गणेशोत्सव विशेष…
नाशिक श्रीगणेश…
स्वयंभू श्री ढोल्या गणपती
वाईचा ढोल्या गणपती किंवा इंदौरचा बडा गणपती यांच्या प्रमाणेच नाशिकला देखील एक महाकाय गणपती आहे. श्री ढोल्या गणपती याच नावाने नाशिकचा हा गणपती प्रसिद्ध आहे. इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम आयोजित गणेशोत्सव विशेष लेखमालेत आज आपण नाशिकच्या या प्राचीन ढोल्या गणपतीची माहिती पाहणार आहोत.
पूर्वी नाशिक हे नऊ शिखा किंवा नऊ टेकड्यांवर वसलेलं गाव होतं. नऊ शिखा या शब्दांवरून या शहराचे नाव नाशिक झाले असे म्हणतात. अशाच एका टेकडीवर स्वयंभू ढोल्या गणपतीचे मंदिर होते. त्याचा आकार आणि स्वरूप यावरून त्याला ‘ ढोल्या गणपती ‘ म्हणत असत. सध्या अशोकस्तंभ परिसरांत असलेले ढोल्या गणपतीचे हे मंदिर हे फार प्राचीन देवस्थान आहे.
आजच्या घडीला नाशिक शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेले गणपतीचे हे मंदिर गावाबाहेर होते. जेथे हे मंदिर आहे तेथे पूर्वी नाशिकची हद्द संपत होती. पूर्वी गावाच्या वेशीजवळ मारूती, भैरवनाथ किंवा गणपतीचे मंदिर असायचे तसे हे मंदिर होते. नाशिकच्या अतिशय गजबजलेल्या व रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असलेल्या अशोकस्तंभावर ढोल्या गणपतीचे मंदिर आहे. पाच- पाच, सात-सात मजली इमारतींच्या आड हे मंदिर दडलेलं आहे. या मंदिरात श्री गणेशाची सहा फूट उंच आणि चार साडेचार फूट रूंद अशी भव्य मूर्ती आहे. मूर्तीपेक्षा मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजा खूपच लहान असल्याने आपण जेंव्हा दरवाजातून आत बघतो तेंव्हा गणपतीचे विशाल रूप पाहून चकित होतो.
ढोल्या गणपतीची मूर्ती शेंदूर चर्चित असल्याने लाल रंगाची दिसत असली तरी मूळ मूर्ती मात्र काळ्यापाषाणाची आहे.
हा ढोल्या गणपती भाविकांच्या मनोकामना पूर्ण करतो असा अनेक भक्तांचा अनुभव असल्याचे श्री ढोल्या गणपती मंदिराचे व्यवस्थापक श्री अमित गायकवाड यांनी सांगितले. दर मंगळवारी, शुक्रवारी आणि संकष्टी चतुर्थीला येथे भाविकांची गर्दी असते.
माघ महिन्यातील गणेश जन्मोत्सव आणि भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. मंदिराला लायटींगचं करतात. मंदिराचे मुख्य पुजारी श्री मधुकर श्रीपादराव गायकवाड असून अमित व किशोर गायकवाड हे येथील व्यवस्थापन पहातात.
Ganeshotsav Special Article Swayambhu Dholya Ganpati by Vijay Golesar
Nashik Ganesh Festival