गणेशोत्सव विशेष
सिन्नरचा महागणपती
इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम आयोजित गणेशोत्सव विशेष लेखमालेत आज सिन्नर येथील जगप्रसिद्ध महागणपतीची माहिती घेणार आहोत. या गणपतीचे वेगळे महत्त्व आणि इतिहास आहे. येथील मंदिर सुद्धा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि ऐतिहासिक आहे.
सिन्नर हे नाशिक पुणे रस्त्यावर नाशिकपासून ३५ किमी अंतरांवर असलेले ऐतिहासिक शहर आहे. सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर सिन्नरच्या ऐतिहासिक परंपरेची साक्ष देते. सिन्नर मध्ये अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. विशेषतः सिन्नर बस स्थापनकापासून जवळच असलेले सिन्नरचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर आणि या मंदिराच्या मैदानावर असलेला महाकाय गणपती पाहण्यासारखे आहेत.
सिन्नरचा हा महागणपती १४ फूट उंच असून डाव्या सोंडेचा आहे .हा महागणपती भाविकांचे श्रद्धास्थान असून पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. सिन्नर येथील पेंटर आणि मूर्तीकार कै रंगनाथजी लोखंडे यांनी १९४७ साली ही महागणपतीची मूर्ती घडविली आहे. स्वातंत्र्य दिना बरोबरच या महागणपतीला देखील यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. महागणपतीची मूर्ती घडविण्यासाठी त्यावेळी ८०० रूपये खर्च आला होता.ही नोंद आज मजेशीर वाटते. सिन्नरचा हा महागणपती १४ फूट उंच असल्यामुळे लांबूनच दिसतो.
महागणपती चतुर्भुज आहे.त्याच्या वरच्या दोन हातात परशु आणि पाश आहेत. पुढच्या उजव्या हाताने हा गणपती बाप्पा भक्तांना आशीर्वाद देत असून त्याच्या डाव्या हातांत लाडु आहे. समोर गणेशाचे वाहन मुषकराज उंदीर मामा हात जोडून उभे आहेत. या गणपतीला शेंदूर लावला जात नाही. त्याऐवजी दरवर्षी लाल रंगाने रंगवितात. त्यामुळे दरवर्षी गणपतीचे आकर्षण अधिकच वाढते. चित्रपट निर्माणकर्त्यांना देखील या महागणपतीचे आकर्षण वाटते. पुजारीन नावंच्या हिंदी चित्रपटात या महागणपतीचे चित्रिकरण केले होते.तर चित्रपट महर्षी व्ही.शांताराम यांनी आपल्या राजकमल स्टुडिओतील गणपती मूर्तीकार कै. रंगनाथ लोखंडे यांचे कडून घडवून घेतला होता अशी एक आठवण सांगितली जाते.
सिन्नरच्या महागणपतीला खर्या अर्थाने जगभर प्रसिद्धी मिळाली ती १९६६ साली प्रसिद्ध झालेल्या एअर इंडिया या आंतरराष्ट्रीय कंपनीने प्रसिद्ध केलेल्या कॅलेंडर मुळे! १९६६ साली एअर इंडिया ने कॅलेंडर प्रसिद्ध केले त्यात ऑगस्ट महिन्यात सिन्नरच्या या महागणपतीचा फोटो छापला आहे. गुगलवर सर्च करून हा फोटो शोधून काढला आहे. आजही सिन्नरला येणारा प्रत्येक भाविक किंवा पर्यटक सिन्नरचा हा महागणपती पाहतो आणि महागणपतीची स्मृती आयुष्यभर आपल्या मनात जपून ठेवतो असा अनुभव आहे.
Ganeshotsav Special Article Sinner Mahaganapati by Vijay Golesar
Ganesh Festival Historic