गणेशोत्सव विशेष लेखमाला-६
श्री तिळा गणपती
(दररोज तिळातिळाने वाढणारा)
इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम आयोजित विशेष गणेशोत्सव मालेत आज नाशिकच्या एका वैशिष्ट्यपूर्ण गणपतीची माहिती आपण पहाणार आहोत. गोदावरीच्या काठावरील पंचवटीच्या ‘ गणेश वाडी’त गणपतीचे हे मंदिर आहे. श्री तिळा गणपती असे या गणपतीचे नाव असून या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे हा गणपती दररोज तिळातिळाने वाढतो आहे. या बाप्पांचा इतिहास अनोखा आहे….
गाडगे बाबा महाराज पुलाच्या पलिकडच्या गणेश वाडीत उजव्या बाजूला एका उंच टेकाडावर या गणपतीच्या नावाची कमान आहे. कमानी खालून २०-२२ पायर्या चढून गेल्यावर एक पेशवेकालीन मंदिर दिसते. या मंदिराचा दरवाजा अतिशय लहान आहे त्यामुळे वाकूनच मंदिरात जावे लागते.
सुरूवातीलाच एक लहानसा सभामंडप असून या सभामंडपात एक सुबक उंदिर आहे. त्याच्या पुढचा दरवाजा थेट गाभाऱ्यात आहे. मंदिर जुन्या पद्धतींचं आहे. गाभाऱ्यात तीन कोनाडे असून मधल्या कोनड्यात श्री तिळा गणपतीची सुबक मूर्ती आहे.
कै.दामोदर दगडुशेठ भडके (सोनार) यांना इ.स. १७६७ साली घराचा पाया खोदत असतांना एक लहानशी दगडी गणेश मूर्ती सापडली. आपल्या नवीन घरासोबतच त्यांनी समोरच्या मोकळ्या जागेवर लहानसे मंदिर बांधून त्या मंदिरात गणेशाची स्थापन केली. तेच हे श्री तिळा गणपती मंदिर !
इ.स. १७६७ साली या मंदिराचे बांधकाम करण्यासाठी ५ हजार रूपये खर्च आला. याच सुमारास आनंदवल्ली येथे राघोबादादा पेशवे यांनी आनंदीबाई पेशवे यांचेसाठी नवश्या गणपतीचे मंदिर बांधले. हा एक योगायोग म्हणता येईल.
गणपतीची ही मूर्ती उत्खननात सापडली तेंव्हा अतिशय लहान होती. पुढे दरवर्षी नियमितपणे मूर्तीला शेंदूर विलेपन केल्यामुळे मूर्तीचा आकार वाढलेला दिसतो. या मूर्तीचा आकार दररोज तिळातिळाने वाढतो असे सांगितले जाते. पौष महिन्यातील तिळकुंड चतुर्थीला या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी अनेक भाविक येथे येऊन गणपतीला तिळगूळाचा नैवेद्य दाखवितात. भडके कुटुंबियांची बारावी पिढी या गणपतीची आणि मंदिराची व्यवस्था पाहते. मागच्या वर्षी त्यांनी मंदिराच्या मूळ रूपाला बाधा येऊ न देता या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. श्री तिळा गणपती हे नाशिककरांच्या श्रद्धेचं स्थान आहे. दर चतुर्थीला भाविक येथे मोठ्या संख्येने श्री गणेशाच्या दर्शनाला येतात.
Ganeshotsav Special Article Shree Tila Ganesh of Nashik By Vijay Golesar
Historic Bappa