गणेशोत्सव विशेष लेखमाला-३ः श्री संकट विमोचन गणपती, पवन नगर
नाशिकचे सुप्रसिद्ध गणपती या विशेष लेखमालेत आज आपण पवन नगरच्या श्री संकट विमोचन गणपती मंदिराची माहिती पाहणार आहोत. सिडको परिसरातील अतिशय दाट लोकवस्तीत असलेले हे मंदिर आणि गणराय अतिशय प्रसन्न आहेत. आज या मंदिर आणि बाप्पांविषयी सविस्तर जाणून घेऊया…
पवन नगरच्या अतिशय गजबजलेल्या रस्त्यावर केबीएच हिरे माध्यमिक विद्यालयासमोर गणपती मंदिर आहे. हे मंदिर पवन नगरचा गणपती म्हणूनच भाविकांमध्ये प्रसिद्ध असले तरी या मंदिराचे नाव आहे- श्री संकट विमोचन गणपती मंदिर!
अनेक भाविकांच्या संकटांचे विमोचन या गणपतीमुळे झालेले आहे.त्यामुळे हजारो भाविकांची पवन नगरच्या या श्री संकट विमोचन गणपतीवर श्रद्धा आहे.
पवन नगर परिसरात १९८८-८९ पासून रहिवासी आपापल्या नवीन घरांत रहायला येऊ लागले.त्यावेळी वीज,पाणी, रस्ते इत्यादी मूलभूत समस्यांसाठी रहिवासी सध्या जिथे गणपती मंदिर आहे तिथे त्यावेळी मोकळे मैदान असल्याने एकत्र जमत. चर्चा होई. प्रश्न सुटत.यावेळीच गणेशोत्सव साजरा करण्यासाठी म्हणून श्री संकट विमोचन गणपती मित्र मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर या परिसरातील रहिवाशांकडून वर्गणी जमा करून १९९०-९१ साली या ठिकाणी १० फ़ूट x १० फूट आकाराचे लहानसे गणपती मंदिर बांधण्यात आले.
इ.स. १९९२ च्या अखेरीस जयपूर येथून श्री संकट विमोचन गणपतीची संगमरवरी मूर्ती तयार करून आणण्यात आली आणि दिनांक २६ जानेवारी १९९३ या दिवशी गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर श्री गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवन नगरच्या या श्री संकट विमोचन गणपती मंदिराची उभारणी लोकवर्गणीतून करण्यात आली आहे. ₹ ५०० किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देणार्या सुमारे १५०० पेक्षा अधिक भाविक व दानशूर व्यक्तींच्या सहयोगातून हे मंदिर बांधण्यात आले आहे. या सर्व देणगीदारांची नावे मंदिराच्या भिंतींवर कोरलेली वाचायला मिळतात.
देणगीदारांकडून मिळालेल्या देणगीतून १९९४ अखेरीस मंदिराच्या भोवती अंदाजे ४० फूट बाय ४० फूट आकाराचा ओटा बांधून त्यावर पत्र्यांची शेड उभारण्यात आली. याच जागेवर १९९५ साली मंदिराच्या नावाने विद्युत कनेक्शन घेण्यात आले.त्याचप्रमाणे भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यात आली. याचवेळी मंदिराचे परिसरात ८ते १० प्रकारची झाडे लावण्यात आली. आता ही सर्व झाडं मोठी उंच झाली आहेत.
हे मंदिर रस्त्याच्याकडेला असल्यामुळे अतिक्रमण थोपविण्यासाठी सिडको प्रशासकांनी कुंपणाचे बांधकाम करून दिले आहे.
मंदिराचा कळस ४४ फूट उंच असून गाभाऱ्यात उंच ओट्यावर श्री संकट विमोचन गणपतीची सुबक मूर्ती भक्तांना अभय व आशीर्वाद देत असते. गणपतीची नित्यपूजा पुजारी करतात. संकष्टी चतुर्थीला विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दर संकष्टीला येथे सुमारे २०० ते ३०० अभिषेक केले जातात. मंदिरासमोर ८ ते १० पानं , फुलं,नारळं इत्यादी गणपतीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य विकणारी दुकानं आहेत.या ८-१० कुटुंबियांचा उदरनिर्वाह श्री गणेशाच्या या मंदिरावरच अवलंबून आहे. श्री संकट विमोचन गणपती मंदिराचा ट्रस्ट असून श्री सूर्यवंशी या ट्रस्टचे सचिव आहेत. भाविक भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा व त्यांच्या संकटांचे विमोचन करणारा पवन नगरचा हा गणपती दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.
Ganeshotsav Special Article Shree Sankat Vimochak Ganesh Pawan Nagar by Vijay Golesar
Nashik Ganesh Festival Temple