गणेशोत्सव विशेष
नाशिक श्रीगणेश
नाशिकचे ग्रामदैवत: श्री मोदकेश्वर
नाशिकचे सुप्रसिद्ध गणपती या विशेष लेखमालेत आज आपण ज्याला नाशिकचे ग्रामदैवत म्हटले जाते त्या श्री मोदकेश्वर गणपतीची माहिती घेणार आहोत.
मोदकेश्वर हे नाशिकचे अतिशय प्राचीन ग्रामदैवत आहे.’ गणेशकोश’ ,’पंचवटी यात्रा दर्शन’ ,’गोदावरी महात्म्य’ या जुन्या धार्मिक ग्रंथांत मोदकेश्वराचा उल्लेख केलेला आढळतो. महाराष्ट्रातील प्रसिद्ध २१ गणपती क्षेत्रांत देखील मोदकेश्वर गणपतीची गणना केली जाते. असे हे प्राचीन गणेश मंदिर पंचवटीत गोदावरीच्या काठावर नाव दरवाजा जवळ आहे. गणपतीचे हे स्थान स्वयंभू आहे असे मानतात.
या गणपतीला मोदकेश्वर असे नाव कसे पडले याविषयी एक रोचक आख्यायिका सांगितली जाते. एकदा गणपती बाप्पा आकाशमार्गे भ्रमण करीत असतांना त्यांच्या हातातील एक मोदक खाली पडला.त्यामोदका पासून गणेशरूप साकार झाले, त्याचा दृष्टांत येथील क्षेमकल्याणी घराण्यातील पूर्वजांना झाला.त्यानुसार त्यांनी या मंदिराची उभारणी केली.
या मंदिरात गेल्यानंतर चार खांबांवर उभारलेल्या गाभाऱ्यात शेंदूर विलेपित मोदकेश्वर विराजमान झालेले दृष्टीस पडतात. सकाळी सूर्योदय होताच सूर्यकिरणं मोदकेश्वरावर पडतात त्यावेळची शोभा अवर्णनीय असते.
मोदकेश्वरा शेजारीच विश्वेश्वर महादेवाचे मंदिर आहे. पिता आणि पुत्र यांचे इतके निकट सान्निध्य असणे हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे इथल्या कोनड्यात विष्णू, गजलक्ष्मी, हनुमान यांचेसह राम,लक्ष्मण, सीता, विठोबा यांच्या लहान लहान मूर्ती आहेत.
दर महिन्याची संकष्टी चतुर्थी, भाद्रपद आणि माघ महिन्यातील गणेश जन्मोत्सवानिमित्त विविध अलंकारांनी मोदकेश्वराचे रूप सजविले जाते. मंदिराला नेत्रदिपक रोषणाई केली जाते. गोदावरीच्या स्नानाने शरीरशुध्द होते तर मोदकेश्वराच्या दर्शनाने चित्तशुद्धी होते अशी गणेश भक्तांची धारणा आहे.
Ganeshotsav Special Article Nashik Gramdaivat Shree Modkeshwar by Vijay Golesar
Ganpati Panchavati