गणेशोत्सव विशेष
ऐतिहासिक पेशवेकालीन
श्री नवश्या गणपती
प्राचीन काळापासून नाशिक हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. प्रभूरामचंद्राचा सहवास मिळाल्याने पावन पवित्र झालेले हे नगर.भगवान शंकरांचे निवासस्थान असणारे त्र्यंबकेश्वर देखील हाकेच्या अंतरावर आहे. गंगे नंतरची देशातली सर्वांत लांब असलेल्या गोदावरीच्या तीरावर वसलेलं नाशिक. असंख्य मंदिरांची रेलचेल असलेल्या नाशिकमध्ये गणपतीची अनेक मंदिरं आहेत. यंदा ‘इंडिया दर्पण’ मधून नाशिकच्या काही सुप्रसिद्ध गणपती मंदिरांची माहिती सादर करीत आहोत.

मो. ९४२२७६५२२७
नाशिकच्या गणपती मंदिरात अग्रक्रमाने लोकप्रिय असलेले मंदिर म्हणजे पेशवेकालीन ऐतिहासिक श्री नवश्या गणपती मंदिर. सुमारे अडिचशे वर्षांपूर्वी गोदावरीच्या तीरावर बांधलेले हे ऐतिहासिक मंदिर आजही सुस्थितीत आहे. एवढेच नाही तर गणेशभक्तांमध्ये त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे.
ऐतिहासिक श्री नवश्या गणपती
नवसाला पावणारा तो नवश्या गणपती. नवश्या गणपतीच्या नावाची उत्पत्ती अशी सांगितली जाते. गंगापूर रोडवर सोमेश्वर मंदिरापासून अगदी जवळ नवश्या गणपतीचे पेशवेकालीन मंदिर अाहे. नारायणरावांच्या हत्येनंतर आनंदीबाई पेशवे यांना नाशिक जवळील चावंडस गावी ठेवण्यात आले.१५ ऑगस्ट १७६४ यादिवशी आनंदीबाई यांना पुत्र प्राप्ती झाली. आपल्याला येथील नवश्या गणपतीच्या आशीर्वादाने पुत्रप्राप्ती झाली अशी त्यांची गाढ श्रद्धा होती. त्यामुळे इ.स. १७७४ मध्ये त्यांनी येथे मोठे दगडी मंदिर बांधले.तेच हे ऐतिहासिक पेशवेकालीन श्री नवश्या गणपती मंदिर देवस्थान.
आनंदीबाई यांच्या वास्तव्यामुळे या गावाला ‘ आनंदवल्ली’ हे नाव पडले.पूर्वी येथे आनंदीबाई पेशवे यांचा वाडा होता. परंतु काळाच्या ओघात तो नष्ट झाला. श्री नवश्या गणपती मंदिराच परिसर उंच उंच इमारतींनी भरला आहे. मात्र येथील घनदाट झाडांमुळे इथले वातावरण शांत आणि प्रसन्न वाटते. मुख्य रस्त्यापासून जरा खाली खोल नदीपात्राकडे पायर्या उतरून गेल्यानंतर पूर्वाभिमुख गणेश मंदिर आणि त्याच्या समोर असलेला प्रशस्त सभामंडप दिसतो. सभामंडपात दोन्ही बाजूंना अष्टविनायकातील सुप्रसिद्ध आठ गणपती पहायला मिळतात. या मंदिराचा गाभारा अतिशय लहान आहे. या गाभाऱ्याला घुमटाकार शिखर आहे.
नवश्या गणपतीच्या डोक्यावर मुकूट असून गणेशमूर्ती चतुर्भुज आहे. गणपतीच्या वरील दोन हातांत पाश आणि फुले असून खालील हातात मोदक आणि दुसरा हात आशीर्वाद मुद्रेत आहेत. मूर्तीच्या मागे चांदीचे नक्षीदार मखर आहे. नवसपूर्ती झाल्यावर भाविक येथे लहान मोठ्या घंटा बांधतात.येथील सभामंडपातले सर्व खांब असंख्य घंटांनी शोभिवंत झाले आहेत. गणेशा समोरच्या भिंतवर राघोबा दादा पेशवे आणि आनंदीबाई पेशवे आणि त्यांना पावलेला नवश्या गणपती यांचे अतिशय सुंदर चित्र येथे रंगविलेले आहे. श्री नवश्या गणपती मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापन जाधव कुटुंबिय करतात. श्री राजूशेठ जाधव अध्यक्ष असून श्री ईश्वर जाधव विश्वस्त आहेत. या व्हिडिओत त्यांनी माहिती दिली आहे. श्री नवश्या गणपती मंदिराच्या डाव्या बाजूला गोदातीरावर मनपा च्या अधिकृत बोटिंग ची सुविधा उपलब्ध आहे. येथे येणारे पर्यटक गोदावरीच्या पात्रात बोटीने फिरण्याचा आनंद घेतात.
https://twitter.com/BhavBrahma/status/1564499653638631424?t=MB4GmbQnjDsEHKRPyhdezg&s=19
Ganeshotsav Special Article Historic Navshya Ganapati
Ganesh Festival Vijay Golesar Nashik Ganpati