गणेशोत्सव विशेष लेखमाला
नाशिक श्रीगणेश
गोविंदनगरचा श्री सिद्धीविनायक गणपती
नाशिकच्या गोविंदनगर, सद्गुरू नगर, कर्मयोगी नगर, कोशिको नगर या सर्व परिसरात गोविंदनगरचे श्री सिद्धिविनायक गणपती व दक्षिणमुखी हनुमान मंदिर प्रसिद्ध आहे. आज आपण या गणेशाची महती जाणून घेणार आहोत….
गोविंद नगर येथील रहिवाशांनी २००४ साली श्री गणेश सेवाभावी संस्था या नावाने एका संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून गोविंदनगर येथील गणेश चौकात लोकवर्गणीतून सध्याचे श्री सिद्धिविनायक गणपती व दक्षिणमुखी हनुमान मंदिर बांधण्यात आले. या मंदिरात श्री सिद्धिविनायक गणेशाची पंचधातूंची तसेच दक्षिणमुखी हनुमान मंदिरात श्री हनुमानाची पंचधातूंच्या मूर्तीची दिनांक ५ मे २००५ रोजी प्रतिष्ठापना करण्यात आली.
मंदिरातील गाभाऱ्यात श्री सिद्धिविनायकाची पंचधातूंची अत्यंत सुबक मूर्ती आहे. सिद्धिविनायकाला चार हात आहेत. वरच्या दोन हातांत पाश व फुलं असून समोरच्या एका हातात मोदक आहे तर उजवा हात आशीर्वाद मुद्रेत आहे.
मंदिराच्या गाभाऱ्या समोर प्रशस्त सभामंडप आहे. या ठिकाणी गोविंदनगर परिसरांतील तीन जेष्ठ नागरिक संघ तसेच महिला मंडळ धार्मिक ग्रंथ वाचन व इतर कार्यक्रमांसाठी करतात. तसेच येथील बागेत बसण्यासाठी बेंच असून त्याचाही जेष्ठ नागरिकांना उपयोग होतो. श्री सिद्धिविनायक व हनुमान यांचे नित्यपूजेसाठी गुरूजी व परिसराची, गार्डन व मोठ्या वृक्षांची देखभाल व स्वच्छता राखण्याकरिता वॉचमनची नियुक्ती केली आहे. दर चतुर्थीला मंदिरात सुमारे दीड ते दोन हजार राजगिरा लाडूंचे वाटप केले जाते. माघी गणेश जयंतीला भंडारा घालण्यात येतो.
Ganeshotsav Special Article Govind Nagar Siddhvinayak by Vijay Golesar