गणेशोत्सव विशेष
नाशिक श्रीगणेश
भद्रकालीचा श्रीमंत साक्षी गणपती
नाशिकला भद्रकाली कारंजा परिसरात श्रीमंत साक्षी गणपती नावाचा प्रसिद्ध गणपती आहे. हा गणपती म्हणजे पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची जणू प्रतिकृतीच आहे. भद्रकाली परिसरातील श्री भद्रकाली कारंजा मित्र मंडळ ट्रस्ट यांनी १९९६ साली या गणपतीची स्थापन केली.पुणे येथील दगडुशेठ हलवाई गणपतीचे तत्कालीन अध्यक्ष कै. तात्यासाहेब गोडसे यांच्या पुढाकाराने श्रीमंत साक्षी गणपती दगडुशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती साकारणे शक्य झाले.
मूर्तीकार पद्माकर सोनवणी यांनी २५० किलो सोनं आणि पितळ यांपासून ही मूर्ती घडविली असून या साक्षी गणपतीची दररोज तिन वेळा पूजा केली जाते. काशी येथील प्रख्यात पंडित रामा नरेशाचार्य आणि प.पू.कै.गणेशबाबा यांच्या उपस्थितीत भद्रकाली कारंजा येथील श्रीमंत साक्षी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. श्रीमंत साक्षी गणपती हा नाशिक मधील मानाचा चौथा गणपती आहे. श्री भद्रकाली कारंजा मित्र मंडळ ट्रस्ट तर्फे माघी जन्मोत्सव आणि भाद्रपद गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो. या मंडळाने सादर केलेल्या अनेक आकर्षण देखाव्यांना अनेक पारितोषिकं देखील मिळालेली आहेत.
अनेक भक्तांनी या गणपतीला नवसाचे दागिने अर्पण केले आहेत. यात सव्वा किलो चांदीचे कान, पाच पदरी चांदीचा हार, तीन किलो चांदीचा उंदीर, ५ किलो चांदीची गणपतीची शस्त्रं तसेच हातातील कडे आणि गणपती समोरील ५१ किलो पितळेचा उंदीर यांचा समावेश आहे. श्रीमंत साक्षी गणपती नवसाला पावतो अशी त्याची ख्याती आहे. या गणपतीच्या छातीत ‘गणेश यंत्र’ सिद्ध करण्यात आले असून त्यामुळेच भक्तांनी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण होते असे सांगितले जाते. भद्रकाली कारंजा मित्र मंडळ ट्रस्ट यांचे कडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.यामध्ये अन्नदान,शैक्षणिक साहित्य वाटप, समाजातील गरजू विद्यार्थांना शिक्षण यांचा समावेश आहे.
Ganeshotsav Special Article Bhadrakali Sakshi Ganapati by Vijay Golesar