नाशिक – गणेशोत्सव महिनाभरवर येऊनही बाजारात फारशी तेजी नसल्याने यंदाही गणेश मूर्तीकार धास्तावले आहेत.. यंदाही सर्वच सण आणि उत्सव यावर असलेले कोरोनाचे सावट, त्यातच कोकणात झालेली पूर परिस्थिती, इंधन दरवाढ, वाढलेला वाहतूक खर्च, पावसाची ओढ, गणेश मूर्तींच्या कच्च्या मालाचे वाढलेले दर याचा मोठा परिणाम सध्या दिसून येत आहे. त्यामुळेच अजूनही बाजारपेठेमध्ये ग्राहकांचा शुकशुकाट दिसून येत आहे.
नाशिकच्या विविध भागात गणेश मूर्ती विक्रीसाठी लागणारी दुकाने तसेच विविध मंडळांकडून गणेश मूर्तींची बुकिंग करण्यासाठी होणारी चौकशी यंदाही अभावानेच आढळत आहे. नाशिकचे मूर्तीकार मयूर मोरे यांची तिसरी पिढी गणेश मूर्ती व्यवसायात आहे. वर्षभर सर्व प्रकारच्या मूर्ती, रंगकाम हा त्यांच्या कुटुंबाचा पूर्णवेळ व्यवसाय आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेश मूर्ती विक्रीवर प्रचंड दुष्परिणाम झाला. पुढच्या पिढीला मूर्तिकला शिकवायची की नाही? असा विचार पडला आहे, असे त्यांनी इंडिया दर्पण शी बोलताना सांगितले आहे.