नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जुने सिडकोतील राजे छत्रपती मित्र मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात उज्जैनच्या प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली जात आहे. ही प्रतिकृती ६१ फूट उंच, ३० फूट रुंद आणि ५० फूट लांब असणार आहे. या भव्य रचनेचे काम प्रगतीपथावर असून उत्तर प्रदेशहून आलेले तीस कुशल कारागीर गेल्या १ महिन्यापासून काम करत आहेत. उज्जैनच्या प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती नाशिककरांसाठी आकर्षण ठरेल असा विश्वास मंडळाचे संस्थापक आणि शिवसेना महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी व्यक्त केला.
जुने सिडकोतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील राजे छत्रपती मित्र मंडळाचे गणेशोत्सवाचे हे २५ वे वर्ष आहे. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यंदाच्या गणेशोत्सवात जुने सिडकोतील एन-१ सेक्टर येथील राजे छत्रपती व्यायामशाळेमागील मैदानात उज्जैनच्या प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. ही प्रतिकृती ६१ फूट उंच, ३० फूट रुंद आणि ५० फूट लांब असणार आहे. मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये १२ बाय ३० फूट आकाराची वॉकिंग गॅलरी असून तिच्या दोन्ही बाजूंना पारंपरिक भारतीय शैलीतील भव्य स्तंभ उभारण्यात येत आहेत. यामध्ये २५ फूट लांब हॉलमध्ये महाकालेश्वर शिवलिंग आणि गणपतीसाठी स्वतंत्र स्थान ठेवण्यात आले आहे. हॉलच्या वरती गोल घुमट आणि ७१ फूट उंच शिखर उभारले जाणार आहे, जे संपूर्ण रचनेला दिव्यतेची अनुभूती देईल.
नक्षीदार प्रवेशद्वारावर स्वागत कमान उभारण्यात येत असून, तिची रचना देखील पारंपरिक भारतीय शैलीत केली जात आहे. ही कमान संपूर्ण प्रतिकृतीला अधिक आकर्षक आणि देखणी बनवणार आहे.
सजावटीसाठी POP, लाकूड, बांबू, मेटल पाइप्स आणि पर्यावरणपूरक रंगांचा वापर करण्यात येत आहे. संपूर्ण प्रतिकृती बाहेरून प्रकाशयोजनेने उजळवली जाणार असून, मंदिराची प्रतिकृती ही पूर्णपणे स्वतंत्र, संपूर्ण आणि भक्तिभावाने परिपूर्ण असेल. उत्तर प्रदेशहून आलेले तीस कुशल कारागीर गेल्या काही दिवसांपासून अथक परिश्रम घेत आहेत. नाशिककरांनी गणेशोत्सवात या भव्य आणि आध्यात्मिकतेने परिपूर्ण सजावटीचे दर्शन घ्यावे. तसेच, गणेशोत्सव काळात मंडळातर्फे रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन राजे छत्रपती मित्र मंडळाचे संस्थापक आणि शिवसेना महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
याशिवाय, उज्जैन महाकाल मंदिरातील प्रमाणे सर्व नित्य पूजा व आरती याचेही नियोजन करण्यात आले आहे.