नाशिक : पोलिसांनी विजय बिरारी प्रकरणी लवकरच योग्य ती पावले उचलली जाणार असल्याचा पोलिसांनी शब्द दिल्याने, आम्ही आत्मदहनाचा निर्णय मागे घेत असल्याची माहिती ओबीसी सुवर्णकार समितीचे अध्यक्ष गजू घोडके यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, एका चोरीच्या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी दोन वर्षांपूर्वी तेलंगणा पोलीस नाशिकमध्ये आले होते. त्यांनी सुवर्णकार व्यापारी विजय बिरारी यांना अटक करून त्यांना नाशिकच्या विश्रामगृहावर तब्बल चार दिवस कस्टडीत ठेवले होते. या ठिकाणी त्यांचा अतोनात छळ केला. तसेच त्यांच्याकडे चार कोटी रुपयांची मागणीही केली. या कस्टडीदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांनी चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याचा बनाव यावेळी पोलिसांनी रचला.
या घटनेला आता दोन वर्षे उलटूनही बिरारी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नाही. तसेच कोणीही चोर सुवर्णकारांचे नाव घेतो अन् पोलीस त्या सुवर्णकाराचा छळ करतात, त्यांच्यावर गुन्हा दाखल करत असल्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. पोलिसांच्या या जुलमी कारवाईला आळा बसावा तसेच विजय बिरारी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा याकरिता मी गेल्या सहा दिवसांपासून अन्नत्याग करीत ३० जानेवारी रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र पोलिसांनी विजय बिरारी प्रकरणी लवकरच योग्य ती पावले उचलली जाणार असल्याचा पोलिसांनी शब्द दिल्याने आम्ही आत्मदहनाचा निर्णय मागे घेतला आहे.
मला भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी संपर्क साधून आत्मदहन आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केली. तसेच आमच्या मांगण्यावर सकारात्मक विचार केला जाणार असल्याचा शब्द दिला. यावेळी त्यांनी पोलीस महासंचालकांशी लवकरच चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले. तसेच मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांचीही याप्रकरणी भेट घेतली जाणार असल्याचे सांगितल्याने, आम्ही आमचे आत्मदहन आंदोलन मागे घेतले. परंतु, जर पोलिसांनी या मागण्यांचा विचार न केल्यास, आमचा आत्मदहनाचा पवित्रा कायम राहणार असल्याचेही गजू घोडके यांनी स्पष्ट केले.
यावेळी गजू घोडके यांच्यासह अहिर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष राजाभाऊ दिंडोरकर, लाड सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष राजाभाऊ कुलथे, संजय मंडलिक, रमेश वखारकर, हरिओम संस्थेचे अध्यक्ष श्याम बिरारी, प्रकाश थोरात, नंदु कहार, संकेत बिरारी तसेच सर्व समाजबांधवांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.