इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखालील भारतातील अग्रगण्य वन्यजीव बचाव व संवर्धन केंद्र वनतारा आणि भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या प्रोजेक्ट एलिफंटच्या संयुक्त विद्यमाने ‘वनतारा गजराज सम्मेलन’ या पाच दिवसांच्या विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जामनगर येथे करण्यात आले आहे. हत्तींच्या सेवा आणि संवर्धनाला समर्पित असलेला हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रशिक्षण कार्यक्रम आहे.
या शिबिरात १०० हून अधिक महावत व हत्ती विषयक तज्ज्ञ पारंपरिक तसेच आधुनिक वैज्ञानिक पद्धतींच्या सहाय्याने हत्तींच्या काळजी व व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्व सहभागींपर्यंत अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येईल.
वनताराचे सीईओ विवान करानी यांनी सांगितले, “हे सम्मेलन केवळ प्रशिक्षणाचा उपक्रम नाही, तर करुणा आणि संवेदनशीलतेच्या भावी युगाची पायाभरणी आहे. आमचे उद्दिष्ट पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय साधून हत्तींच्या कल्याणासाठी एक शाश्वत आणि सक्षम यंत्रणा उभारणे हे आहे. हत्तींचे संरक्षण केवळ धोरणे किंवा निवासस्थानापुरते मर्यादित नसून त्यांची देखभाल करणाऱ्यांच्या कौशल्य आणि संवेदनशीलतेवरही अवलंबून आहे.”
हा कार्यक्रम जामनगर येथील राधे कृष्ण टेंपल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टच्या परिसरात पार पडत आहे, ही संस्था वनताराच्या अंतर्गत कार्यरत आहे.
सध्या वनतारामध्ये २५० हून अधिक हत्तींची सेवा केली जात आहे, ज्यांची देखभाल ५०० पेक्षा अधिक प्रशिक्षित कर्मचारी करतात. याशिवाय आफ्रिकेतील काँगो देशातून वन्यजीव अधिकारी व तज्ज्ञही प्रशिक्षणासाठी उपस्थित आहेत.
याच वर्षी ऑक्टोबरमध्ये राष्ट्रीय प्राणी संग्रहालय संचालकांचे (नेशनल झू डायरेक्टर्स) एक विशेष सम्मेलनही वनतारा येथे आयोजित करण्यात येणार आहे. अशा उपक्रमांमधून देशविदेशातील तज्ज्ञ, धोरणनिर्माते आणि वन्यजीव सेवा क्षेत्रातील कार्यकर्ते एकत्र येऊन सहकार्य, संवाद आणि संवर्धन यांसाठी अधिक परिणामकारक कार्यवाही पुढे नेऊ शकतील.