मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७९ वर्षाचे होते. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता भारत इतिहास संशोधन मंडळात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अत्यंत साधी राहणी, अस्सल दस्तऐवज आणि पुरावे हातात ठेऊन कमालीच्या संयत भाषेत इतिहासातील वास्तव सांगणारा महर्षी म्हणून ओळख असणारा इतिहास संशोधक काळाच्या पडद्याआड गेल्याची खंत इतिहास संशोधकांनी व्यक्त केली. इतिहासाच्या अभ्यासासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचा अभ्यास व लेखन करण्यासाठी त्यांचे योगदान अतुलनीय होते. गेली ५० वर्षे त्यांनी इतिहासाच्या संशोधन कार्याला वाहून घेतलं होतं. शिवचरित्र आणि युध्द इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते. सध्या ते इस्लामाची ओळख आणि औरंगजेब या विषयावर संशोधन आणि लिखाण करत होते.