नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन्ही लेकरांचे ‘मृतदेह’ खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे जात असलेले हे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आहे. आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. वेळेत उपचार मिळाले नाही. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दीड तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला ही माहिती देत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे एक भीषण वास्तव पुढे आणले आहे. या घटनेचा व्हिडिओ सुध्दा त्यांनी शेअर केला आहे.
त्यांनी सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, रुग्णालयातून मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. आईवडिलांनी दोन्ही भावंडांचे मृतदेह खांद्यावर घेतले. चिखलातून वाट शोधत १५ किलोमीटर दूर अंतरावरचे अहेरी तालुक्यातील पत्तीगाव पायीच गाठले.
गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे एक भीषण वास्तव आज पुन्हा पुढे आले.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेला हा जिल्हा. हेलिकॉप्टरने विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे महायुतीतील कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ. दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो हे सांगत असतात.
दोघांनी एकदा जमिनीवर उतरून आपल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकं कसे जगतात, जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरणयातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावे.