गडचिरोली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकेकाळी हातात बंदुका घेऊन तथाकथित क्रांतीच्या रक्तरंजित मार्गावर चालणाऱ्या आदिवासींना नक्षलवादी म्हणतात. पण, आता या नक्षलवाद्यांची कामगिरी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. होय, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या गडचिरोली सीमावर्ती भागातील माजी नक्षलवादी आता अभिनेता बनणार आहेत. आणि, ज्या चित्रपटात माजी नक्षलवादी अभिनय करणार आहे तो चित्रपट मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांना घराबाहेर झोपडीत राहायला लावण्याच्या दुष्ट प्रथेवर आधारित आहे.
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तृप्ती भोईर आणि निर्माता विशाल कपूर यांनी गडचिरोली जिल्ह्यात त्यांच्या ‘कुमराघर’ या चित्रपटासाठी ऑडिशन आयोजित केले होते, ज्यामध्ये राज्य पोलिसांच्या पुढाकाराने आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी सहभाग घेतला होता. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना भविष्यात चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळावी आणि अभिनय क्षेत्रात करिअर करता यावे, ज्यामुळे त्यांना स्वत:ची नवी ओळख निर्माण करता येईल, यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.
हा चित्रपट गडचिरोलीच्या आदिवासींच्या परंपरेवर आधारित आहे. या चित्रपटाविषयी बोलताना तृप्ती भोईर म्हणाल्या, ‘कुर्मघर परंपरेवर चित्रपट बनवताना केवळ गडचिरोली जिल्ह्यातील कलाकारांनाच चित्रपटात घेण्याचा माझा मानस आहे, कारण त्यामुळे त्यांच्यावरील नक्षलवादाचा कलंक दूर होऊन जिल्ह्यात जनजागृती होऊ शकते. तसेच ही बाब त्यांची प्रतिमा सुधारण्यात मदत करेल. आम्ही आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचे ऑडिशन घेतले आहे, ज्यामध्ये अनेक प्रतिभावान कलाकारांची निवड करण्यात आली आहे.
कुर्मघर आदिवासींची एक परंपरा आहे, ज्यामध्ये आदिवासी महिलांना मासिक पाळीच्या वेळी घराबाहेर बांधलेल्या झोपडीत राहावे लागते, ज्याला कुर्मघर म्हणतात. याच परंपरेवर आधारित या चित्रपटाचे नावही ‘कुमराघर’ ठेवण्यात आले आहे. तृप्ती भोईर सांगतात की, ‘आमच्या या चित्रपटाच्या माध्यमातून नक्षलवाद्यांना त्यांच्यातील कलागुण दाखवण्याची संधी तर मिळेलच, शिवाय त्यांच्यामध्ये शतकानुशतके जुन्या कुर्मघर परंपरेबद्दल जागृतीही होईल.’
मराठी अभिनेत्री तृप्ती भोईर हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटांमधील एक प्रसिद्ध नाव आहे. अनेक मराठी चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून तिने आपली छाप सोडली आहे. ‘टूरिंग टॉकीज’ सारख्या अनेक मराठी चित्रपटांचीही तिने निर्मिती केली आहे. ‘टूरिंग टॉकीज’ला अकादमी पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट चित्र श्रेणीत निवडण्यात आले. तृप्ती भोईर अनेकदा चित्रपटांमध्ये तिच्या व्यक्तिरेखेचे प्रयोग करत असते. ‘अगडबम’ या मराठी चित्रपटात तिने नेजिका या लठ्ठ मुलीची भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेसाठी तृप्ती भोईरचे खूप कौतुक झाले होते.