मुंबई – देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी नक्षल कारवाई आज झाली आहे. पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत तब्बल २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. या चकमकीत नक्षलवाद्यांचा म्होरक्या आणि कुख्यात नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे हा सुद्धा मारला गेल्याचे सांगितले जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे. “आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,” अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले.
आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. नक्षलवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत असलेल्या सी-६० दलाने मिळालेल्या माहितीआधारे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली. या कामगिरीबद्दल महाराष्ट्र विशेषतः गडचिरोली पोलिसांचे गृहमंत्र्यांनी मनपूर्वक अभिनंदन केले आहे.
https://twitter.com/TheWolfpackIN/status/1459531786371973124