गडचिरोली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन सख्खे शेजारी हे एकमेकांचे चांगले मित्र असतात. अनेक ठिकाणी तसे दिसते. परंतु काही ठिकाणी ते एकमेकांचे पक्के वैरी देखील होऊ जातात. त्यामुळे मग किरकोळ कारणावरून देखील त्यांच्यात वाद होऊन खटके उडतात. त्याची परिणीती एखाद्या वाईट घटनेत देखील होऊ शकते. मग ते कोणत्या पदावर आहेत आणि काय करतात हे येथे गौण ठरते. गडचिरोली जिल्ह्यात अशीच एक वाईट घटना घडली.
कार्यालय व वसाहतीतही शेजारी
देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३ मुख्यालय परिसरात राज्य राखीव दलाच्या तुकडीमध्ये काम करणारे सुरेश राठोड व मारोती सातपुते दोन सहकारी एकमेकांच्या शेजारी राहतात, त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हे किरकोळ कारण म्हणजेच कचरा टाकण्यावरून झालेल्या वादातून मारोती सातपुते याने सुरेश राठोड या सहकाऱ्याची चाकू भोसकून हत्या केली. आरोपी जवान मारोती सातपुते याला अटक करण्यात आली आहे.
आणि रात्रीच्या सुमारास
विशेष म्हणजे मारोती सातपुते आणि सुरेश राठोड हे दोघेही जवान यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. विसोरा येथे राज्य राखीव बल गट क्रमांक १३ चे जिल्हा मुख्यालय आहे. या परिसरातील वसाहतीत सुरेश राठोड आणि मारोती सातपुते शेजारी वास्तव्यास होते. मागील काही दिवसांपासून दोघांच्याही कुटुंबात कचरा टाकण्यावरून व इतर कारणावरून वाद सुरू होते. दरम्यान रात्री ११ वाजताच्या सुमारास दोघांमधील वाद विकोपाला गेला. आरोपी मारोती याने घरातून चाकू आणून सुरेशवर वार केले. यात सुरेशचा मृत्यू झाला. याप्रकरणी देसाईगंज पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली आहे. या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत असून उलट सुलट चर्चा देखील होत आहे.