मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या ‘गदर २’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला २४ तासांत ९.९ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची चित्रपट रसिक प्रतीक्षा करत होते. त्यामुळे त्याचा ट्रेलरच सोशल मीडियावर चांगला हिट ठरला आहे.
ब्लॉकबस्टर सिनेमा, पैसा वसुल सिनेमा असणार अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. हा सिनेमा ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या ट्रेलरमध्ये सनी देओल म्हणजेच तारा सिंहचे रौद्र रुप पाहायला मिळत आहे. सनी देओलसह अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्माच्या अभिनयाचंही कौतुक होत आहे. आता या सिनेमातील गाण्यांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अनिल शर्मा यांनीच सांभाळली आहे. या चित्रपटात अभिनेता असलेला उत्कर्ष शर्मा हा अनिल शर्मा यांचा मुलगा आहे. या चित्रपटाच्या पोस्टरला चाहत्यांनी पसंती दिली आहे.
उत्कृष्ट कथा, दर्जेदार अभिनय, मंत्रमुग्ध करणारे संगीत आणि भारत पाकिस्तान मधील फाळणीनंतरची परिस्थिती यावर ‘गदर – एक प्रेमकथा’ या चित्रपटाने प्रदर्शनानंतर परीक्षकांची मने जिंकली. या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारलेले कलाकार म्हणजे सनी देओल, आमिष पटेल, अमरीश पुरी यांनी आपल्या भूमिकेत जीव ओतला. त्यामुळे आजही हा चित्रपट आवर्जून पहिला जातो. आता सुमारे २२ वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वेल येत आहे.
प्रत्येक दशकात चित्रपट आणि त्यांच्या कथा बदलत गेल्याचे आपल्याला पाहायला मिळते. २००१ मध्ये भारतीय चित्रपटविश्वाची गणितं बदलणारा ‘लगान’ प्रदर्शित झाला आणि सगळेच प्रेक्षक अवाक झाले. आशुतोष गोवारीकर, आमिर खान, झामु सुगंध यांच्या मेहनतीला यश आलं आणि ‘लगान’ बॉक्स ऑफिसवर सुपरहीट ठरला. याच दिवशी आणखीन एक चित्रपट प्रदर्शित झाला ज्याने आमिरच्या ‘लगान’ला चांगलीच झुंज दिली. तो चित्रपट म्हणजे सनी देओलचा ‘गदर एक प्रेम कथा’.
‘गदर’नेही बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली. १८ ते १९ करोड रुपये बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने त्यावेळी साधारण ७८ करोड रुपयांचा गल्ला जमवला. तर सगळ्यात जास्त पुरस्कार मिळवणारा हा चित्रपट ठरला होता. सनी देओलची भूमिका आणि चित्रपटातील संवाद याने हा चित्रपटही प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. आता अनेक चित्रपटांचे भाग येत आहेत. तेव्हा ‘गदर’ या चित्रपटाचा पुढचा भाग येणार असल्याची चर्चा बरीच वर्षं सुरू होती. अखेर काही महिन्यांपूर्वी सनी देओलने अधिकृतरित्या या दुसऱ्या भागाची घोषणा केली. आणि आता ११ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
पहिल्या चित्रपटाप्रमाणे या भागालाही प्रेक्षक तितकाच उदंड प्रतिसाद देतील असा आत्मविश्वास सनी देओल याने दाखवला आहे. त्याने सांगितले की, “आपल्याकडे कोणत्याही चित्रपटाचा दुसरा भाग फसतो. त्यामुळे जर कथा चांगली असेल तर नक्कीच दुसरा भाग बनवला पाहिजे आणि मला या कथेवर पूर्ण विश्वास आहे. चित्रपटाचा थोडा भाग लखनौमध्ये चित्रित झाला आहे. ” याबरोबरच ‘गदर’चा पहिला भाग पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित करावा ज्यामुळे आजच्या काळातील मुलांना तो चित्रपट अनुभवता येईल अशी अपेक्षा सनीने व्यक्त केली आहे.
‘गदर – २’ विषयी दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं की “आम्ही जुन्याच कलाकारांबरोबर काम केले. आताची कथा २२ वर्षांनंतरची आहे. नवीन प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक वेगळा आणि स्वतंत्र अनुभव असेल.” सनी देओल आता दाक्षिणात्य सुपरस्टार दुलकिर सलमान आणि अभिनेत्री श्रेया धन्वंतरी यांच्याबरोबर ‘चूप’ या चित्रपटात झळकणार आहे. यानंतर सनी एका मल्याळम चित्रपटाच्या रिमेकवरही काम सुरू करणार असल्याचं सांगितलं जात आहे.