मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जी-20 शिखर परिषद प्रथमच भारतात होणार असून दिल्ली येथे होणाऱ्या या परिषदेचे प्रतिनिधी महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या शहरांसह औरंगाबाद येथील विविध स्थळांनाही भेटी देणार असल्याची माहिती औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयात जी-20 शिखर परिषदेच्या नियोजनाकरिता पुर्वतयारी बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.प्रसन्ना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नीलेश गटणे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उर्किडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जी-20 शिखर परिषदेचे सहभागी प्रतिनिधी ९ व १० फेब्रुवारी २०२३ आणि २२ व २३ मे २०२३ रोजी औरंगाबाद शहराला भेट देणार आहेत. वेरुळ, अजिंठा लेण्यांनाही भेट देणार असून येथील पर्यटन व औद्योगिक विकासाला अधिक चालना मिळाणार असल्याने प्रतिनिधींच्या स्वागतासाठी प्रशासकीय पातळीवर चोख नियोजन ठेवण्याच्या सूचना बैठकीत श्री.केंद्रेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
भारत, इटली व इंडोनशिया हे तीन देश जी-20 परिषदेचे आयोजन करत असून माहे फेब्रुवारी-२०२३ व मे-२०२३ मध्ये जी-20 परिषदेसाठी औरंगाबाद येथे जगभरातील ४० देशातून सुमारे ५०० प्रतिनिधी भेट देणार आहेत. या अतिमहत्वाच्या प्रतिनिधींच्या निवास, सुरक्षा, वाहतूक व इतर अनुषंगिक व्यवस्थेबाबत विभागीय आयुक्तांनी संबंधितांना सूचना दिल्या. या भेटीदरम्यान पाहुण्यांची कुठलीही अडचण होता कामा नये याकरिता चोख व्यवस्था ठेवण्याच्या सूचनाही श्री.केंद्रेकर यांनी यावेळी दिल्या.
G20 Summit Dignitaries Will Visit Maharashtra Cities
Aurangabad Pune