नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ब्रिटनचे संरक्षण मंत्री टॉम तुगेंधत यांनी केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. कोलकाता येथे जी २० भ्रष्टाचारविरोधी मंत्रीस्तरीय बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. तुगेंधत यांच्यासोबत ब्रिटनचे उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळ आले असून भारतासोबत अधिक सहकार्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला.
अधिक पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त समाज निर्माण करण्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील आहेत, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. भ्रष्टाचाराविरुद्ध भारताचे धोरण अत्यंत कठोर असून भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार स्पष्ट केले असल्याचे त्यांनी सांगितले. माहिती आणि संवाद तंत्रज्ञान (ICT) नवोन्मेषाचे आदानप्रदान, आंतर-क्षेत्रीय सहकार्य आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि त्याविरुद्ध लढण्यासाठी भागीदारी स्थापन करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये व्यापक सहकार्याचे आवाहन डॉ जितेंद्र सिंह यांनी केले.
भारत, संयुक्त राष्ट्रांच्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या करारावर( यूएनसीएसी) स्वाक्षरीकर्ता असल्याने, परदेशी सरकारी अधिकार्यांच्या लाचखोरीशी संबंधित (परदेशी लाचखोरी) यूएनसीएसीच्या कलम १६ ची देखील अंमलबजावणी करावी, हा ब्रिटनचा प्रस्ताव तुगेंधत यांनी पुन्हा एकदा भारतासमोर मांडला. आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहारातील परदेशी सरकारी अधिकार्यांच्या लाचखोरीला पायबंद घालण्यासाठी आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेच्या (ओईसीडी) करारावर स्वाक्षरी करण्याचेही त्यांनी भारताला आवाहन केले. या कराराला ओईसीडी लाचखोरी प्रतिबंध करार असेही म्हणतात.
भारताने आधीच यूएनसीएसीला मान्यता दिली असल्याचे डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
सरकारच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलण्यात आली असून यामध्ये ई-गव्हर्नन्सचा अवलंब, थेट लाभ हस्तांतरणासाठी आधार प्रणालीची अंमलबजावणी, सार्वजनिक कार्यालयांमधील खरेदी सुधारणा आणि नागरिक सनद यांचा समावेश असल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. जी २० भ्रष्टाचार विरोधी कार्य गट (एसीडब्ल्यूजी) मंच आणि संबंधित संयुक्त बैठकांमध्ये भारत सक्रियपणे सहभागी असल्याचे डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
G20 Ministerial Meet in Kolkata