अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऐरवी जातवैधता प्रमाणपत्र इयत्ता १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले जाते. अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मात्र इयत्ता ११ वीत शिकणाऱ्या २४७ विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र वाटप करण्याचा नावीन्यपूर्ण, स्तुत्य असा उपक्रम सुरू केला आहे. एक वर्षाआधी, ते पण एका दिवसातच प्रमाणपत्र मिळाल्यामुळे विद्यार्थी व पालकांना सुखद धक्का बसला आहे. यामुळे त्यांच्या वेळ व श्रमाची बचत ही झाली आहे.
अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती त्यांच्या लोकाभिमुख व जलद कामकाजामुळे राज्यात अव्वल क्रमांकावर आहे. सेवा पंधरवड्यात सर्वाधिक प्रमाणपत्र वाटप करून समिती राज्यात पहिल्या क्रमांकावर राहिली. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सामाजिक न्याय भवनाच्या उद्घाटन भाषणात जिल्हा समितीच्या कामकाजाचे कौतूक केले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील ‘मंडणगड पॅटर्न’ची राज्यात प्रथम अंमलबजावणी व पासपोर्टच्या धर्तीवर जातवैधता वाटप करणारी राज्यातील पहिली समिती अहमदनगर जिल्हा समिती ठरली. जिल्हा समितीच्या या विविध उपक्रमात आता एका वर्षाआधीच प्रमाणपत्र वाटप करणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची भर पडली आहे.
महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पाथर्डीमधील श्री तिलोक जैन उच्च माध्यमिक विद्यालयात ‘जातवैधता प्रमाणपत्र’ वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अहमदनगर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) विकास पानसरे अध्यक्षस्थानी होते. यावेळी समितीच्या सदस्या तथा उपायुक्त आमिना शेख , सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी भाऊ खरे, व्यवस्थापक प्रविण बेळगे, प्राचार्य अशोक दौंड, विभागप्रमुख सुधाकर सातपुते आदी उपस्थित होते.
या शिबिरासाठी तिलोक जैन महाविद्यालयांने त्यांच्या व तालुक्यातील इतर महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे १ डिसेंबर २०२२ पूर्वी २७३ प्रस्ताव जमा करून घेतले होते. या सर्व प्रस्तांवाची जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने एकदिवसीय शिबिरात छाननी करून २४७ विद्यार्थ्यांना जागेवरच जात वैधता प्रमाणपत्रांची वाटप केले.
समिती अध्यक्ष श्री.पानसरे यावेळी म्हणाले की, ‘‘इयत्ता ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र वाटपाचे राज्यातील हे पहिलेच उदाहरण आहे. विद्यार्थ्यांना एक वर्षाआधी प्रमाणपत्र देवू शकलो याचे समाधान आहे. जिल्हा समितीच्या या उपक्रमाची ‘पाथर्डी पॅटर्न’ म्हणून राज्य पातळीवर नोंद घेतली जाईल. जिल्ह्यातील इतर तालुक्यातील मोठ्या महाविद्यालयांनी श्री तिलोक जैन महाविद्यालयाचा आदर्श घेऊन तालुक्यात एकाच ठिकाणी शिबिराच्या आयोजनात पुढाकार घ्यावा. जेणेकरून विद्यार्थ्यांना जागेवरच प्रमाणपत्र प्राप्त होऊन त्यांचा वेळ व श्रम वाचेल.’’ शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुनील कटारिया, प्राध्यापक जब्बार पठाण, प्रकाश पुरी, संतोष घोगरे, रवींद्र बुधवंत, सचिन काकडे, संध्या पालवे, तरन्नूम शेख यांनी प्रयत्न केले.
FYJC Student Cast Validity Certificate Distribution