अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविद्यालयातच विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या संकल्पनेला महसूल विभागाचा सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सेतू सुविधा केंद्रामार्फत महाविद्यालयातच ‘जात प्रमाणपत्र’ देण्यात येणार आहे. यासाठी ‘जात प्रमाणपत्र’ नसलेल्या विद्यार्थ्यांना डाटा तयार करण्याचे काम समाज कल्याण विभागाचे समतादूत करत आहेत. महसूल विभागाच्या सकरात्मक प्रतिसादामुळे ‘मंडणगड पॅटर्न’ ला अहमदनगर जिल्ह्यात बळ मिळाले आहे.
‘मंडणगड पॅटर्न’चा परिचय करून देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यासाठी आज ‘ऑनलाईन वेबीनार’ घेण्यात आला. अहमदनगर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) विकास मारूती पानसरे यांनी वेबीनार मध्ये अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. अहमदनगर येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातून सदस्य तथा उपायुक्त अमीना शेख आणि सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी भागवत खरे सहभागी झाले होते.
राज्याचे समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील ‘मंडणगड पॅटर्न’ नुसार महाविद्यालयातच ”जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र” वितरित करण्याच्या सूचना केल्या आहेत. या नुसार अहमदनगर जिल्ह्यात काम करण्यात येणार आहे.
इयत्ता अकरावीत प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये किती विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र नाही. याचा डाटा समतादूत यांच्या मार्फत ८ दिवसाच्या आत जमा करण्यात येईल. जात प्रमाणपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाचे सेतू सुविधा केंद्र महाविद्यालयात पाठविण्यात येईल. या केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालयातच विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वितरित करण्यात येईल. असे समिती अध्यक्ष विकास पानसरे यांनी सांगितले.
‘मंडणगड पॅटर्न’ नुसार महाविद्यालयात जात प्रमाणपत्र देण्याच्या संकल्पनेला महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त असा सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. ८ दिवसात जात प्रमाणपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांचा डाटा प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच जात प्रमाणपत्र वितरित करण्यास सुरूवात करण्यात येईल. अशी माहिती संशोधन अधिकारी भागवत खरे यांनी दिली आहे.
FYJC Admission Student Cast Certificate
Education