पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या २५ जुलैपासून इयत्ता ११वीच्या पहिल्या प्रवेश फेरीला सुरुवात झाली आहे. आज ३ ऑगस्ट रोजी पहिली गुणवत्ता यादी थोड्याच वेळात जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्य मंडळाचा निकाल १७ जुलैला जाहीर झाला. मात्र इतर मंडळाचे निकाल जाहीर झाले नसल्याने प्रवेश प्रक्रिया रखडली होती. आता इतर बोर्डाचे निकाल जाहीर झाले असल्याने अकरावी प्रवेशाची पहिली फेरी सुरू झाली आहे. या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार २५ जुलै सकाळी १० पासून ते २७ जुलै रात्री १० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालयाचे पसंती क्रमांक नोंदवयाचा होता. म्हणजेच नियमित प्रवेश फेरी एक साठी पसंती अर्ज भाग -२ ऑनलाईन सादर करायचा होता.
यामध्ये विद्यार्थ्यांना १ ते १० कॉलेजचा पसंतीक्रम देता येत होते. विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीमध्ये अर्धाचा भाग २ लॉक करायचा होता. विद्यार्थ्यांच्या डेटा प्रोसेसिंग नंतर गुणवत्तेनुसार आणि दिलेल्या पसंतीनुसार कॉलेज पहिल्या फेरीमध्ये मिळतील. जे नवीन विद्यार्थी या ऑनलाईन ११वी प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत त्यांना अर्जाचा भाग एक आणि भाग २ भरता येईल.
सर्वसाधारण गुणवत्ता यादीत दुरुस्ती असेल तर ऑनलाईन हरकती विद्यार्थ्यांनी सादर करायच्या आहेत. या सगळ्या दुरुस्ती झाल्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतिम केली जाणार आहे. ३ ऑगस्ट सकाळी १० वाजता प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. यामध्ये पहिल्या फेरीचे कट ऑफ पोर्टलवर दर्शविले जातील. ३ ऑगस्ट सकाळी १० ते ६ ऑगस्ट सायंकाळी ६ वाजेपर्यंत पहिल्या फेरीमध्ये मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करता येईल.
मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा असल्यास प्रवेशाची औपचारिकता या काळात विद्यार्थ्यांनी पूर्ण करावी आणि आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ७ ऑगस्ट रोजी अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जारी केल्या जातील व त्यानंतर दुसरी फेरी आयोजित केली जाईल. १८ ते २५ ऑगस्ट दरम्यान नियमित तिसरी प्रवेश फेरी होणार असून २६ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान नियमित प्रवेशाची विशेष फेरी होणार आहे.
FYJC Admission Process Merit List Date Education 11th Eleventh