विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
बुरशीजन्य आजार आता एक एक करून समोर येतच राहणार आहेत. त्याचे स्वरूपही घातक राहील. कोविडच्या रुग्णांना आवश्यक असलेले स्टेरॉइ़ड दिले जात आहे. परंतु त्याने शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊ लागली आहे. परिणामी हवेमधील बुरशी हळूहळू लोकांना आपल्या कवेत घेऊ लागली आहे.
सध्या म्युकरमायकोसिसमुळे कोविड रुग्णांमध्ये काळी बुरशी समस्या वाढवत आहे. कोरोनातून बरे झालेल्या लोकांमध्ये पांढरी बुरशी आढळू लागली आहे. बुरशीचे अनेक प्रकार असून, त्या जीवघेण्या ठरू शकतात, असे दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटीग्रेटिव्ह बायोलॉजीचे माजी उपसंचालक आणि बुंदेलखंड विद्यापीठातील बायोमेडिकल सायन्स विभागाचे माजी संचालक डॉ. जी. एल. शर्मा यांचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोविडनंतर दिसणारी लक्षणे अधिक प्रमाणात प्राणघातक ठरू शकतात. पुढील काळात बुरशीजन्य आजाराचे अनेक प्रकार दिसण्याची शक्यता आहे.
डॉ. शर्मा सांगतात की, काही दिवासांपूर्वी म्युकरमायकोसिसमुळे कोरोनाबाधिकांच्या समस्या वाढल्या आहेत. म्युकरमायकोसिस, म्युकर नावाच्या बुरशीमुळे होतो. कोविडबाधितांमध्ये म्युकर बुरशीमुळे नाक, कान, डोळे, घसा तसेच फुफ्फुसात गंभीर समस्या निर्माण झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्याचप्रमाणे राहिजोपस, कॉक्सिडीओसिस, हिस्टोप्लास्मोसिस, ब्लास्टोमायकोसिस आणि एस्पर्जिलोसिस नावाचे इतर बुरशीचे संसर्ग आहेत. कोविड-१९ झालेल्यांच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहेत.
भारतीय उपखंडाची भौगोलिक स्थिती आणि संसर्गाच्या व्यापकतेनुसार, एस्पर्जिलोसिस हा प्रकार सर्वाधिक चिंताजनक आहे. बुरशी आजारामध्ये एस्पर्जिलोसिस सर्वाधिक महत्त्वाचा आहे. परंतु याकडे कोणत्याही संशोधक किंवा डॉक्टरांचे लक्ष गेलेले नाही. दोन दिवसांपूर्वी चंदीगडच्या पीजीआय आणि लखनऊच्या केजीएमयू रुग्णालयांमध्ये या बुरशीचे रुग्ण आढळले आहेत.