इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – डेली सोप पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी प्रत्येक मालिका महत्त्वाच्या असतात. ते त्या रंगून बघत असतात. चांगले कथानक, पात्रांचा अभिनय उत्तम असला की, ती मालिका प्रेक्षकांच्या घरातलीच होऊन जाते. स्टार प्रवाह वाहिनीवरील बहुतेक सर्वच मालिकांचा टीआरपी चांगला आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘रंग माझा वेगळा’, ‘आई कुठे काय करते’, ‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ या सर्व मालिका प्रेक्षक आवर्जून पाहत असल्याने या मालिका टॉप फाईव्हमध्ये कायम आहेत. मात्र ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समजते.
कोरोना काळात अनेक मालिकांचे प्रक्षेपण बंद होते. त्यामुळे जुन्याच मालिका पुन्हा दाखवण्यात येत होत्या. कोरोनाचा उद्रेक कमी होऊन शूटिंगला परवानगी मिळाली तेव्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका २ सप्टेंबरपासून सुरू झाली.
एका ध्येयवादी मुलीच्या आयुष्यात एक मोठे वळण येते. त्यामुळे आपली ध्येय बाजूला ठेवून ती संसार करायला लागते. त्यातही एका तत्त्ववादी कुटुंबात ती आल्याने पुढचा प्रवास आणखी कठीण होऊन बसतो. पण, नशिबाने तिचा जोडीदार चांगला असतो. साधा भोळा, प्रेमळ नवरा जो प्रत्येक गोष्टीत तिला सावरून घेतो. तिचं स्वप्न स्वतःचं स्वप्न मानून तो तिच्यामागे खंबीरपणे उभा राहतो. त्यामुळे तिलाही एक नवी उमेद मिळते आणि ती तिचे ध्येय पूर्ण करतेच. मात्र ती गाठल्यावरही संकट काही केल्या तिचा पाठलाग सोडत नाहीत, अशी या मालिकेतील मध्यवर्ती भूमिकेची अर्थात कीर्तीची कथा. स्टार प्रवाहावरील ही सगळ्यात जुनी मालिका आहे. प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून प्रेम दिले आहे.
मालिकेत किर्तीची भूमिका साकारणारी अभिनेत्री समृद्धी केळकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने तिच्या मालिकेबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यात ती आयपीएसच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्यावर तिने एकदा शेवटचं असं म्हटलं आहे. यावर तिने स्टार प्रवाह वाहिनीला टॅग केले आहे. त्याबरोबर तिने #किर्ती, #फुलाला सुगंध मातीचा, #प्रेम असे लिहिले आहे. तिच्या या पोस्टनंतर ही मालिका लवकरच निरोप घेणार असल्याचे बोललं जात आहे.
आता किर्ती आणि शुभम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिका फार कमी वेळात प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली. मात्र मालिकेचं कथानक बदलताच मालिका कंटाळवाणी होत चालली होती. यामुळे ही मालिका ट्रोलही होत होती. आता लवकरच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Fulala Sugandha Maticha TV Serial Close Soon
Entertainment Star Pravah