विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
फरार हिऱ्यांचा व्यापारी मेहूल चौकसी बेपत्ता असून आता एंटिगुआ पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. खुद्द चौकसी याचे वकील विजय अग्रवाल यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. चौकसी याने सामान्य नागरिक म्हणून एंटिगुआ पोलिसांना शरण येण्याची तयारी दाखविली आहे.
सोमवारी रात्री एका प्रसिद्ध रेस्टॉरेंटमध्ये डिनरसाठी घराबाहेर पडलेला मेहुल चौकसी तेव्हापासून बेपत्ता असल्याचे वकिलांनी पोलिसांना सांगितले आहे. चौकसीचे कुटुंबीय सुद्धा चिंताग्रस्त आहेत. त्यांनी मला चर्चेसाठी बोलावले आहे. पण या प्रकरणाची चौकशी एंटिगुआ पोलीस करीत आहे, अशी माहिती वकिलांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. कुटुंबाला कुठलीही माहिती नसून त्यांच्याही सुरक्षेला धोका असल्याचेही वकिलाने म्हटले आहे.
एंटिगुआ आणि बारबुडामध्ये मुक्कामाला असलेला ६१ वर्षीय मेहुल चौकसी भारतातील हिऱ्याचा प्रसिद्ध व्यापारी आहे. तसेच गितांजली या प्रसिद्ध ब्रांडचा मालकही आहे. भारतात सीबीआय आणि ईडीने मेहुल चौकसीला वॉंटेड घोषित केले आहे. ४ जानेवारी २०१८ ला एंटिगुआला पलायन करण्यापूर्वी त्याने पीएनबी घोटाळ्यात ७ हजार ८० कोटी रुपयांची हेराफेरी केली होती.
चोकसीच्या विरुद्ध पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यास सामील असल्याबद्दल अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. २०१३ मध्ये शेअर बाजारात झालेल्या हेराफेरीतही तो सामील होता. पण पीएनबी घोटाळा उघडकीस येताच त्याने पलायन केले. चोकसीने केवळ भारतातीलच नव्हे तर अमेरिका आणि दुबईतील बँकांनाही धोका दिला आहे, असे ईडीचे म्हणणे आहे. त्यामुळे पलायन केल्यानंतर चोकसीची २ हजार ५०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
यावर्षीच्या सुरुवातीला एंटिगुआ आणि बारबुडाने २०१७ मध्ये कॅरेबियन राष्ट्रांच्या नागरिकत्वाद्वारे गुंतवणुक कार्यक्रमांतर्गत चोकसी याचे नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र त्याने न्यायालयात नागरिकत्व रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. तर त्याचवेळी भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यावर्षी मार्चमध्ये निरव मोदी, मेहुल चोकसी आणि विजय माल्य हे फरार आरोपी भारतात परत येत असल्याचा दावा केला होता.