नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी अनेक पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याच्या पाट्या लागल्या असून, ग्राहकांचे हाल होत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. परंतु पेट्रोलियम कंपन्यांना तोटा होत असल्याने पुरवठा कमी होऊ लागला आहे. दरम्यान, इंधनाचे दर वाढणार असल्याच्या अफवा अनेक ठिकाणी पसरल्या असून, रिलायन्सने पेट्रोलचे दर ५, तर डिझेलचे दर ३ रुपयांनी वाढविले आहेत.
देशातील हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोलपंपांना पुरेसा इंधन पुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे अनेक पेट्रोलपंपांवर ग्राहकांच्या लांब रांगा लागल्या आहेत. मध्य प्रदेशच्या पेट्रोल पंप संघटनेने आठ तास पंप सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.
महाराष्ट्रातील औरंगाबादमध्येही इंधन तुटवड्याचा आरोप करण्यात आला होता. आता देशातील इतर ठिकाणीही अशीच परिस्थिती निर्माण होत आहे. कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. परंतु गेल्या चार आठवड्यात इंधनाच्या किमती वाढलेल्या नाहीत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना पेट्रोलमध्ये १६ रुपयांचे तर डिझेलमध्ये २३ रुपयांचे नुकसान होत आहे.
गेल्या चार आठवड्यांमध्ये इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना तोटा सहन करावा लागत असून, देशातील अनेक भागात पेट्रोल पंपांना इंधनाचा पुरवठा होत नाही. गुजरातमधील अहमदाबादमध्ये इंधनाचा पन्नास टक्के पुरवठा होत आहे. राजस्थानमध्येही अशीच परिस्थिती आहे.
उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये पेट्रोल संपणार असल्याची अफवा पसरल्याने रविवारी रात्री पेट्रोलपंपांवर एकच गर्दी झाली होती. बिहारमध्ये पुरवठा प्रभावित झालेला नाही. हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेशमध्ये एचपी आणि भारत पेट्रोलियमच्या पंपांवर इंधनाची टंचाई दिसू लागली आहे. इंडियन ऑइलच्या पंपांवर पुरवठा सुरळीत असला तरी आठवड्याभरात तिथेही इंधनाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.