इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १३७ दिवसांनंतर पुन्हा दरवाढ सुरू झाली आहे. आता मात्र ही दरवाढ लवकर थांबणार नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. कच्च्या तेलाच्या सध्याच्या किमती पाहता, तेल विपणन कंपन्यांना त्यांचे मार्जिन टिकवून ठेवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर १९ रुपयांनी वाढ करणे आवश्यक आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल एक डॉलरच्या वाढीसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सुमारे ५० पैशांची आवश्यकता आहे. गेल्या वेळी जेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले होते, तेव्हा कच्च्या तेलाच्या किंमती ८१.६ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या होत्या. आज कच्चे तेल ११८ डॉलरच्या आसपास आहे. पेट्रोल आणि डिझेलमधील पूर्वीच्या बदलाच्या तुलनेत आज कच्च्या तेलाची किंमत प्रति डॉलर ३७ आहे. अशा स्थितीत तेल विपणन कंपन्यांना त्यांचे मार्जिन टिकवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे १९ रुपयांनी वाढ करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या वेळी जेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दराने लिटरमागे १०० रुपयांचा टप्पा ओलांडला होता तेव्हा केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. ही कपात पेट्रोलवर प्रति लिटर ५ रुपये होती, तर डिझेलवर १० रुपयांनी कपात करण्यात आली होती. कच्च्या तेलाच्या सध्याच्या किमती पाहता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल १०० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार उत्पादन शुल्कात आणखी कपात करू शकते. सध्या पेट्रोलवर २७.९० रुपये प्रति लिटर आणि डिझेलवर २१.८० रुपये उत्पादन शुल्क आहे.
तज्ज्ञ म्हणतात की, अमेरिकेसह प्रमुख देश कच्च्या तेलाच्या किमती खाली आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे या प्रयत्नांना फारसे यश मिळण्याची अपेक्षा नाही. युद्ध संपले तरी कच्च्या तेलाच्या किमती आटोक्यात यायला दोन ते तीन महिने लागतील. त्यानंतरच सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळणार आहे.
याआधी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात २५ रुपयांनी वाढ केली होती. कर जोडल्यानंतर प्रत्यक्षात वाढ सुमारे २८ रुपये आहे.