पुणे – असे म्हटले जाते की, जगात कोणती गोष्ट वाया जात नाही, घरातील महिला किंवा गृहीणी प्रत्येक गोष्टीचा निगुतीने वापर करून घेते. यालाच कोंड्याचा मांडा करणे असे म्हणतात. अगदी मेथीच्या काड्यांपासून काही महिला चटणी तयार करतात. भाजीपाला आणि फळांच्या सालीचा आपण उपयोग करून घेऊ शकतो.
आपण बाजारातून फळे व भाजीपाला आणतो आणि त्याच्या साली बहुतेकदा कचऱ्यात टाकतो, कारण त्या सालीची उपयुक्तता आपल्याला समजत नाही. मात्र फळे आणि भाज्यांच्या सालींमध्येही खूप उपयुक्तता असते. त्याचा वापर आपण अनेक ठिकाणी करू शकतो. आता या सालींची उपयुक्तता जाणून घेऊ…
लिंबाची साल
लिंबाचा रस काढल्यानंतर त्या सालीने पितळेची भांडी पूर्णपणे स्वच्छ होऊ शकतात. तसेच तांब्याची भांडीही स्वच्छ करता येतात. याशिवाय लिंबाची साल त्वचेवर चोळल्यास त्वचा मुलायम होते. दात आणि नखांवर घासल्याने चमक येते. एवढेच नाही तर कपाटात किडे असतील तर लिंबाची साल कोरडी ठेवावी आणि कपाटातील किडे मरतील. बाथरूममध्ये आंघोळीच्या पाण्यात लिंबाची साल आणि संत्र्याची साल टाकल्यास अशा पाण्याने आंघोळ केल्याने शरीर स्वच्छ, चमकदार व सुगंधी राहते.
संत्र्याची साल
संत्र्याची साल देखील उपयुक्त आहे, सध्या बाजारात संत्रा येत आहे, संत्रा खाऊन त्याची साल वाळवून त्याची पावडर बनवता येते. यामध्ये चंदन पावडर आणि दूध मिसळून चेहरा आणि मानेवर लावल्याने त्वचा सुधारते. संत्र्याच्या सालीची पावडर बनवून त्यात खोबरेल तेल आणि गुलाबपाणी टाकून फेस मास्क बनवल्याने त्वचा मुलायम होते.
बटाट्याची साल
जर आपल्या घरातील एखादा आरसा खराब झाला आहे. तर, त्याला स्वच्छ करण्यासाठी आपण बटाट्याची साल वापरु शकता. बटाट्याच्या सालीने आरसा पुसताच तो डाग निघून जातो आणि आरसा चकाकतो.