विशेष प्रतिनिधी, मुंबई
एक जूनपासून गुगल आपल्या सर्व मोफत सेवा बंद करणार आहे. गुगलकडून गुगल फोटो ही मोफत क्लाउड स्टोरेज सेवा जून २०२१ पासून बंद करण्यात येणार आहे. याचाच अर्थ आता गुगल फोटोच्या क्लाउड स्टोरेजसाठी गुगलकडून पैसे वसूल केले जाणार आहेत. गुगल ड्राइव्हवर आपले फोटो किंवा डाटा स्टोअर करण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहे. कंपनीतर्फे ही घोषणा आधी करण्यात आली होती.
सध्याच्या परिस्थितीत गुगलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत स्टोरेज सुविधा देण्यात येत आहे. याच आधारे युजर्स आपले फोटो किंवा इतर कागदपत्रे गुगल स्टोअरमध्ये सेव्ह करत आले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून ते कुठेही उपलब्ध होत होते. जून २०२१ पासून गुगलकडून १५ जीबी मोफत क्लाउड स्टोरेजची सुविधा देण्यात येणार आहे. मर्यादेपेक्षा जास्त स्टोरेज झाल्यास त्याचे पैसे द्यावे लागणार आहेत.
किती मोजावे लागणार पैसे
युजर्सना १५ जीबीहून अधिक डाटाची गरज पडल्यास प्रतिमहिना १.९९ डॉलर (१४६ रुपये) द्यावे लागणार आहेत. कंरनीकडून याला गुगल वन असे नाव देण्यात आलेले आहे. वार्षिक सब्सक्रिप्शनसाठी १९.९९ डॉलर (जवळपास १४६४ रुपये) मोजावे लागणार आहेत. युजर्सना नवे फोटो आणि व्हिडिओंच्या स्टोरेजसाठी पैसे अदा करावे लागणार आहेत. जुने फोटो पूर्वीप्रमाणेच सुरक्षितरित्या स्टोअर राहतील. Google Pixel २ स्मार्टफोनवर ग्राहक मोफत उच्च दर्जाचे फोटो बॅकअपचा वापर करू शकणार आहेत. अशाच प्रकारे Google Pixel २, ३, ४, ५ या स्मार्टफोन युजर्सनासुद्धा मोफत फोटो आणि व्हिडिओ स्टोरेजची सुविधा मिळणार आहे.