मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मे महिना संपण्यासाठी आता पाच दिवस बाकी आहेत. प्रत्येक वेळी नवा महिना सुरू होताच काही लहान-मोठे बदल पाहायला मिळतात. या वेळीसुद्धा जून महिन्यात होणाऱ्या बदलांबाबत तुम्हाला जाणून घेणे आवश्यक आहे. कारण या बदलांचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे. यामध्ये बँकिंग नियमांपासून सोन्याच्या खरेदीपर्यंत नियम बदलणार आहेत. जून महिन्यात नियम बदलून तुमच्या खिशाला किती झळ बसणार आहे ते पाहू या.
थर्ड पार्टी विमा महाग
सर्वात प्रथम खर्च वाढवणाऱ्या बदलाबाबत बोलू या. एक जून २०२२ पासून वाहनांचा थर्ड पार्टी विमा महाग होणार आहे. तुम्हाला विम्याच्या हफ्त्याचे जादा पैसे भरावे लागणार आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या मालकांना वाढलेले दर लागू होणार आहे. थर्ड पार्टी मोटर व्हेहिकल इन्शुरन्सचा प्रीमियम वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला आहे.
इंजिनाच्या क्षमतेनुसार प्रीमियम
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर आता कारच्या इंजिनाच्या क्षमतेनुसार विमा उतरविण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार मोटर इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये २०१९-२० साठी वाढ करण्यात आली होती. मंत्रालयाच्या माहितीनुसार, आता १ हजार सीसी हून कमी क्षमतेच्या इंजिनाच्या वाहनांना थर्ड पार्टी विम्यासाठी २,०९४ रुपये इतका ठरवलेला प्रीमियम भरावा लागणार आहेत. २०१९-२० मध्ये २,०७२ रुपये इतका प्रीमियम भरावा लागत होता. त्याशिवाय १ हजार सीसी ते १५०० सीसी असणाऱ्या कारसाठी थर्ट पार्टी इन्शुरन्सचा प्रीमियम ३,२२१ रुपयांवरून वाढवून ३,४१६ रुपये करण्यात आला आहे. १५०० सीसीच्या वर असणाऱ्या वाहनांसाठी थर्ट पार्टी इन्शुरन्स प्रीमियममध्ये ७,८९० रुपयांऐवजी ७,८९७ रुपये इतकी किरकोळ वाढ करण्यात आली आहे.
दुचाकी वाहनांसाठी प्रीमियम निश्चित
केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार, चारचाकी वाहनांसाठी नव्हे, तर दुचाकी वाहनांच्या इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये केंद्र सरकारने बदल केला आहे. अधिसूचनेनुसार, एक जून २०२२ पासून १५० सीसी ते ३५० सीसी असलेल्या बाइकचा प्रीमियम १,३६६ रुपये वसूल केला जाणार आहे. तर ३५० सीसीहून अधिक क्षमतेच्या दुचाकींसाठी इन्शुरन्स प्रीमियम २,८०४ रुपये निश्चित करण्यात आला आहे.
सोने हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा
आता दुसऱ्या बदलाबाबत बोलू या. गोल्ड हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा १ जून २०२२ पासून सुरू केला जाणार आहे. जूनच्या सुरुवातीला गोल्ड हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा सुरू होणार असल्याची माहिती सरकारने काही दिवसांपूर्वी दिली होती. या अंतर्गत सोन्याची शुद्धतेचा पुरवा देणे आवश्यक असणार आहे.
एसबीआय गृहकर्जाच्या दरात वाढ
जर तुम्ही भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक असाल किंवा तुम्ही एसबीआयकडून गृहकर्ज घेण्याचा विचार करत आहात, तर नव्या महिन्याच्या सुरुवातीला तुमचा खर्च वाढणार आहे. एसबीआयने गृहकर्जाचे एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (ईबीएलआर) ४० बेसिस पॉइंट (बीपीएस)ने वाढवून ७.०५ टक्के केला आहे. तर आरएलएलआर ६.६५ टक्के अधिक सीआरपी असेल. एसबीआयच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार वाढलेले व्याजदर १ जूनपासून लागू होणार आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक शुल्क लागू
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) च्या माहितीनुसार, आधार सक्षम पेमेंट प्रमाली (एईपीएस)साठी जारी करण्याचे शुल्क बँकेने लागू केले आहे. हे शुल्क १५ जून २०२२ पासू लागू केले जाणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही भारतीय डाक सेवेची सहाय्यक कंपनी आहे. डाक विभागाकडून तिचे कामकाज पाहिले जाते. नियमांतर्गत प्रत्येक महिन्यात पहिले तीन एईपीएस मोफत असतील. यामध्ये एईपीएस रोख काढणे, एईपीएस रोख जमा करणे आणि एईपीएस मिनी स्टेटमेंटचा समावेश आहे.
एक्सिस बँकेच्या बचत खात्याच्या नियमात बदल
एक्सिस बँकेच्या बचत खात्याच्या नियमात एक जूनपासून बदल होणार आहे. निमशहरी आणि ग्रामीण भागात सोप्या बचत आणि वेतन कार्यक्रमांसाठी खात्यामध्ये सरासरी मासिक शिल्लक रकमेची मर्यादा १५ हजार रुपयांवरून वाढवून आता २५ हजार रुपये किंवा एक लाख रुपयांची मुदतठेव करण्यात आली आहे. लिबर्टी बचत खात्यासाठी ही रक्कम १५ हजार रुपयांवरून वाढवून २५ हजार रुपये किंवा २५ हजार रुपये खर्च करण्यात आली आहे. नवा टेरिफ प्लॅन १ जून २०२२ पासून लागू होणार आहे.