पुणे – आगामी डिसेंबर महिन्यात तुमच्या खिशाला झळ बसणार आहे. विशेषतः इंटरनेट युजर्सना या समस्येचा सामना करावा लागू शकतो. १ डिसेंबरपासून जिओ रिचार्जसह एकूण ४ सेवा महाग होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या महिन्याभराच्या आर्थिक नियोजनावर होणार आहे. या सर्व ऑनलाइन सेवांची किंमत जवळपास २० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये डीटीएच रिचार्ज, एसबीआय क्रेडिट कार्डसारख्या सुविधांचा समावेश आहे.
जिओ रिचार्ज प्लॅन
रिलायन्स जिओचे नवे टेरिफ प्लॅन १ डिसेंबरपासून देशभरात लागू होणार आहेत. त्यामध्ये २० टक्क्यांची वाढ होणार आहे. जिओ फोनचा ७५ रुपयांचा प्लॅन ९१ रुपयांना मिळेल. तर १२९ रुपयांचा अमर्यादित प्लॅन १५५ रुपयांना मिळणार आहे. जिओने आपल्या वार्षिक प्लॅनमध्ये सर्वाधिक ४८० रुपयांची वाढ केली आहे. जिओचा ३६५ दिवसांच्या प्लॅनसाठी २३९९ रुपयांऐवजी आता २८७९ रुपये द्यावे लागणार आहेत.
अॅमेझॉन प्राइम रिचार्ज
अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप प्लॅनचे नवे शुल्क १४ डिसेंबरपासून देशभरात लागू होणार आहेत. अॅमेझॉन प्राइम सब्सक्रिप्शनमध्ये ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे वार्षिक सब्सक्रिप्शन प्लॅनची किंमत आता १४९९ रुपये होणार आहे. सध्या हा प्लॅन ९९९ रुपयांमध्ये मिळतो. तीन महिन्यांच्या प्लॅनसाठी ३२९ रुपयांऐवजी आता ४५९ रुपये द्यावे लागणार आहेत. महिन्याच्या प्लॅनसाठी १२९ रुपयांऐवजी १७९ रुपये अदा करावे लागतील. अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप प्लॅनसाठी ऑटो रिन्यू पर्याय निवडणार्या ग्रहाकांवर वाढलेल्या किमतीचा परिणाम होणार नाही.
डीटीएच रिचार्ज
एक डिसेंबरपासून देशात काही निवडक चॅनल्सचे दर वाढणार आहेत. हे चॅनल्स पाहण्यासाठी युजर्सना ५० टक्के अधिक पैसे द्यावे लागणार आहे. स्टार प्लस, कलर्स, सोनी, झी सारखे चॅनल्स पाहण्यासाठी ग्राहकांना ३५ ते ५० टक्के अधिक रक्कम द्यावी लागणार आहेत. सध्या या चॅनल्सची सरासरी किंमत ४९ रुपये प्रति महिना आहे. ती वाढून ६९ रुपये प्रति महिना होऊ शकते. सोनी चॅनल पाहण्यासाठी ३९ रुपयांऐवजी ७१ रुपये प्रतिमहिना द्यावे लागणार आहे. झी चॅनलसाठी ३९ रुपयांऐवजी ४९ रुपये प्रतिमहिना या हिशेबानुसार चार्ज केले जाणार आहे. व्हिएकॉम १८ चॅनलसाठी प्रतिमहिना २५ रुपयांऐवजी ३९ रुपये द्यावे लागतील.
एसबीआय क्रेडिट कार्ड
एसबीआय क्रेडिट कार्डधारकांना जोरदार झटका लागणार आहे. १ डिसेंबरपासून एसबीआय क्रेडिट कार्डवरून कोणतेही खरेदी महाग होणार आहे. प्रत्येक खरेदीवर ९९ रुपयांचे प्रक्रिया शुल्क वेगळे द्यावे लागणार आहे. त्यामुळे एसबीआय क्रेडिट कार्डधारकांना आता जपूनच खरेदी करावी लागणार आहे.