नवी दिल्ली – कोरोनाच्या ओमीक्रॉन या नव्या अवतारामुळे जगभरात दहशत पसरलेली असताना दुसरीकडे देशात कर्नाटकमधील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पार्टी सुपर स्प्रेडर ठरली आहे. या पार्टीत सहभागी झालेल्या जवळपास २८१ विद्यार्थ्यांसह इतरांना कोरोनाची लागण झाली आहे. दुसर्या लाटेनंतर प्रथमच ही सुपर स्प्रेडरची घटना ठरली आहे. देशातील दुसर्या राज्यांमध्येही विविध ठिकाणी कोरोनारुग्णांचा स्फोट होताना दिसत आहे.
कर्नाटकः फ्रेशर्स पार्टी झाली सुपर स्प्रेडर
बंगळुरूपासून ४५० किलोमीटर दूर असलेल्या धारवाड शहरातील एसडीएम वैद्यकीय महाविद्यालयात दहा दिवसांपूर्वी झालेली फ्रेशर्स पार्टी आता सुपर स्प्रेडरची घटना झाली आहे. सुरुवातील या पार्टीत सहभागी ६६ विद्यार्थी आणि स्टाफ बाधित आढळले होते. आता या आयोजनामुळे बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या २८१ झाली आहे. जिल्हाधिकार्यांच्या माहितीनुसार बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कारण अजूनही १८२२ जणांचे कोविड अहवाल येणे बाकी आहे. या वैद्यकीय महाविद्यालयातील दोन वसतिगृहे सील करण्यात आली आहेत. रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
तेलंगणः विद्यापीठ कँपस बंद
हैदराबादजवळील महिंद्रा विद्यापीठात कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत २५ विद्यार्थी आणि पाच शिक्षक बाधित झाल्याचे आढळले आहे. येथील कँपस बंद करण्यात आला आहे. १७०० विद्यार्थी आणि प्राध्यापकांना आपापल्या घरात विलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिंद्रा कंपनीचे हे खासगी विद्यापीठ आहे.
राजस्थानः एका शाळेतील १२ विद्यार्थी बाधित
राजस्थानमध्ये १५ नोव्हेंबरपासून पूर्ण क्षमतेने शाळा सुरू केल्यानंतर आतापर्यंत १९ विद्यार्थी कोरोनाबाधित झाले आहेत. जयपूरमध्ये गेल्या मंगळवारी एका खासगी शाळेत १२ विद्यार्थी बाधित आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. १७ नोव्हेंबर रोजी अडीच वर्षाच्या एका मुलाचा मृत्यू झाला. तीन महिन्यांनंतर राजस्थानमधील हा पहिला मृत्यू होता.
उत्तराखंडः राष्ट्रीय वन अॅकॅडमीमध्ये संसर्ग
उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अॅकॅडमीमध्ये हिमाचल प्रदेशमधून आलेल्या बाधित अधिकार्यामुळे आतापर्यंत एकूण ११ वन अधिकार्यांना संसर्ग झाला आहे. जिल्हाधिकार्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी अॅकॅडमीकडून खुलासा मागविला आहे. तिबेट कॉलनीमध्ये ६ रुग्ण आढळले आहेत. दोन्ही ठिकाणांना प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.
पंजाबः दोन सरकारी शाळांमध्ये संसर्ग
होशियारपूर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात १४ विद्यार्थ्यी बाधित आढळल्याच्या आठवडाभरातच एका सरकारी शाळेत १३ विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. दोन्ही शाळा बंद करून विद्यार्थ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शेजरच्या गावांमध्ये चाचण्या करण्यात येत आहेत, असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.
ओडिशाः सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात ५५ बाधित
ओडिशातील एका प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत ५५ विद्यार्थी आणि स्टाफ कोरोनाबाधित आढळले आहेत. वीर सुरेंद्र साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्चच्या कँपसमध्ये शुक्रवारी पाच रुग्ण आढळले आहेत. या कँपसच्या अनेक वसतिगृहे आणि स्टाफच्या निवासस्थानांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.
संसर्गामुळे चिंता वाढली
सध्या देशात ज्या राज्यांमध्ये सामुहिक संसर्गाची प्रकरणे समोर येत आहेत, त्यातील बहुतांश रुग्ण ब्रेक थ्रू संसर्गाचे आहेत. म्हणजेच ज्या नागरिकांनी लस घेतली आहे अशांना कोरोनाची लागण होत आहे. अशा प्रकारच्या घटना देशातील चिंता वाढविणार्या आहेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याचाच अर्थ असाही होतो की लस घेतलेल्या नागरिकांचा निष्काळजीपणा वाढलेला आहे. लस फक्त संसर्गाची जोखीम कमी करते, पूर्णपणे सुरक्षा देत नाही, हे जगजाहीर आहे. त्यामुळे सर्वांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.