विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई – राज्यातील 18 ते 44 या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राज्यात १ मे पासून १८ ते ४४ या वयोगटाचे लसीकरण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही लसीकरण मोहिम मेच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची चिन्हे आहेत.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, गेल्या वर्ष-सव्वा वर्षांपासून आपण कोविडची लढाई लढतो आहोत. जानेवारीपासून केंद्राच्या सहकार्याने राज्यात लसीकरण सुरु आहे. आजतागायत ४५ च्या पुढील वयोगटातील दीड कोटीपेक्षा जास्त जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा देशात विक्रम आहे.
लस पुरवठ्याप्रमाणे लसीकरण कार्यक्रम घोषित करणार
उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच इतर सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. सध्या राज्यासमोर आर्थिक चणचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळेच १८ ते ४४ च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.
जास्तीत जास्त लस मिळविण्याचे प्रयत्न
सध्या सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसी उपलब्ध असून, त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून, पाठपुराव्याने जास्तीत जास्त लस उपलब्ध करून देण्यात येईल.
उत्तम नियोजन करावे
18 ते 44 वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केली आहे.
कोविन ॲपवर नोंदणी करा
या वयोगटातील नागरिकांनी कोविन मोबाईल ॲपवर नोंदणी करावी, कुठेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. लसीकरणाबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना मिळतील असेही मुख्यमंत्री म्हणतात.
0000
हाफकिनला कोविड लस प्रकल्प सुरू करण्यास मान्यता
हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळास कोविड लस प्रकल्प सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैव तंत्रज्ञान विभागाच्या सहाय्याने आणि मे.भारत बायोटेक इंटरनॅशनल लि., हैद्राबाद या कंपनीकडून कोविड-19 या साथ रोगाच्या लसीचे उत्पादन तंत्रज्ञान घेऊन महामंडळाच्या परळ, मुंबई येथील जागेत रूपये 154 कोटी भांडवली खर्चाच्या कोवॅक्सिन लस उत्पादनाचा हा प्रकल्प सुरू होईल.
प्रकल्पाच्या उभारणीसाठी रूपये 94 कोटी इतके अर्थसहाय्य राज्य शासनाच्या आकस्मिकता निधीतून खर्च करण्यात येईल. केंद्र शासनाने रूपये 65 कोटी इतके अर्थसहाय्य मंजूर केले आहे.