पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रक्षकच भक्षक बनत असल्याची उदाहरणे आपण बरेचदा बघत असतो. विशेषत: पोलिस विभागंच कायदा सुव्यवस्था मोडत, भ्रष्टाचाराला खतपाणी घालत इतराचे शोषण करत असल्याच्या घटना घडत असतात. असाच काहीसा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तसेच अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत घडला आहे.
फुकटची तिकीटे न दिल्यास छत्रपती संभाजी महाराजांवरील महानाट्याचा प्रयोग बंद पाडण्याची धमकी पोलिसांनी दिली आहे. याबाबत स्वत: अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त करत महानाट्य बंद पाडण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप केला आहे.
‘प्रामाणिकपणे एक गोष्ट नमूद करू इच्छितो की, आतापर्यंत संभाजीनगर, नाशिक, निपाणी, कोल्हापूर, कराड या प्रत्येक ठिकाणी पोलिस बांधवांनी प्रचंड सहकार्य केले. नाशिकमध्ये पोलिस आयुक्तांनी तर २ हजार ५०० पोलिस बांधवांना त्यांच्या कुटुंबासह या महानाटकाचे तिकिट काढून दाखवले. मात्र, आज मी खेदाची बाब शेअर करण्यासाठी आलो आहे. आज पिंपरी चिंचवडमध्ये अत्यंत खेदजनक अनुभव आला आहे. मी त्या पोलीस बांधवांचे नाव सांगणार नाही. कारण विरोध व्यक्तीला नाही, विरोध प्रवृत्तीला आहे. ही प्रवृत्ती नाटकाचे मोफत तिकिट मागण्याची आहे. अगदी शेवटी ३०० रुपयांचे तिकिट काढून आपल्या लेकरांना संभाजीमहाराजांचा इतिहास दाखवायला आलेल्या प्रत्येक पालकाचे मी आभार मानतो.
मोफत तिकीट मागणाऱ्या प्रवृत्तीला मी एवढेच सांगतो की, येथे बसलेले सर्वजण कराचे पैसे देतात आणि त्या करातून पोलिसांना महिन्याचा पगार मिळतो. असे असुनही छत्रपतींचा इतिहास पाहण्यासाठी हे मोफत तिकिट मागतात. तसेच मोफत तिकिट दिले नाही, तर नाटक कसे होते ते बघतो असे म्हणतात,’ या शब्दांमध्ये अमोल कोल्हे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
https://twitter.com/kolhe_amol/status/1657415841284231168?s=20
उज्ज्वल परंपरेला गालबोट लावू नका
पोलिस दलाला उज्ज्वल परंपरा आहे. २६/११ च्यावेळी ज्यांनी जीवाचे बलिदान दिले, कोव्हिडकाळात ज्यांनी प्राणांची पर्वा न करता रस्त्यावर होते. त्यामुळे येथे बसलेल्या त्या पोलिस बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की, अशा पोलिस दलाच्या उज्ज्वल परंपरेला शुल्लक कारणासाठी गालबोट लावू नका. मी जाणीवपूर्वक तुमचे नाव घेत नाहीये, असे कोल्हे यांनी नमूद केले आहे.
https://twitter.com/kolhe_amol/status/1657416737514754050?s=20
Free Tickets Demand Pimpri Police MP Amol Kolhe Drama