नवी दिल्ली (इंडया दर्पण वृत्तसेवा) – दिल्ली आणि एनसीआर परिसरात फ्लॅट्स आणि भूखंड विक्री करून सामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका वाँटेड भूमाफियाला उत्तर जिल्हा पोलिसांनी नाशिकमधून अटक केली आहे. पीयूष तिवारी ऊर्फ पुनीत भारद्वाज (४२) असे आरोपीचे नाव असून. त्याला २०१८ साली फसवणुकीच्या अनेक प्रकरणात फरारी घोषित करण्यात आला होता. त्याच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.
पोलिस उपायुक्त सागर सिंह कलसी म्हणाले, की ५० हजार रुपयांचे बक्षीस असलेला आरोपी पीयूष तिवारी हा महाराष्ट्रातील नाशिकमध्ये लपून बसला असल्याची गुप्त माहिती मिळाली. नाशिकमध्ये आरोपी तिवारी हा अन्नसाखळी व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक स्थापन करण्यात आले. पोलिसांच्या पथकाने छापा टाकून आरोपीला अटक केली.
आरोपीने चौकशीदरम्यान अनेक खुलासे केले आहेत. अधिकारीक सूत्रांच्या माहितीनुसार, २०११ साली संशयित तिवारीने बांधकाम व्यवसायिक म्हणून काम सुरू केले होते. २०१८ सालापर्यंत त्याने आठ कंपन्यांसह १५ ते २० लहान कंपन्या स्थापन केल्या. २०१६ मध्ये प्राप्तिकर विभागाच्या पथकाने त्याच्या ठिकाणांवर छापा टाकून १२० कोटी रुपये जप्त केले होते. बांधकाम व्यवसायाच्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी त्याने एकच फ्लॅट अनेकांना विक्री करून अनेकांची फसवणूक केली.
अनेक प्रकरणांमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपीने दिल्ली येथील बस्तान हलवून दक्षिण भारतात मोर्चा वळवला. खोटे नाव धारण करून त्याने वेगवेगळे व्यवसाय सुरू केले. तांत्रितरित्या पाळत ठेवून पोलिसांचे एएटीएस पथक पीयूष तिवारीच्या मागावर होते. पोलिस पथकाने नाशिक येथे जाऊन कांदा विक्रेते आणि अन्न साखळी मालकांची माहिती गोळा केली.
तो एका रेस्टॉरंटमध्ये काम करत असल्याची माहिती गोपनीय माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने संशयिताच्या हालचाली टिपण्यास सुरुवात केली आणि त्याला पकडण्यासाठी त्याचे ठिकाण शोधून काढले. संशयित तिवारीला अटक करून त्याच्याविरोधात भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२० आणि १२०बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.