नवी दिल्ली – गुगल आणि इतर कंपन्यांच्या एकाधिकारशाही विरोधात आवाज उठवणे वेगळे आणि प्रत्यक्ष कारवाई करून दाखविणे वेगळे. फ्रान्सने ते करून दाखविले. ऑनलाईन जाहिरातीच्या क्षेत्रात एकाधिकाराचा दुरुपयोग करण्याच्या आरोपात आता गुगलला तब्बल २७ कोटी डॉलर म्हणजे जवळपास १ हजार ९४७ कोटी रुपयांचा दंड फ्रान्सकडे भरावा लागणार आहे. फ्रान्समधील आयोगाकडे गुगलने दंड भरण्याचे कबुलही केले आहे.
गुगलने या घडामोडींनंतर ऑनलाईन जाहिरातीच्या व्यवस्थेत बदल करून ते अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न करू, असे स्पष्ट केले आहे. जाहिरातींमधून गुगलला दरवर्षी २.९८ लाख कोटी रुपयांची कमाई होते. त्यामुळे गुगलचे मालकी हक्क असलेल्या अल्फाबेट कंपनीसाठी हा दंड अगदीच नाममात्र आहे.
मात्र पहिल्यांदाच त्याला एवढा मोठा फटका बसल्यामुळे जगभरात आश्चर्य व्यक्त होत आहे. ऑनलाईन जाहिरात तंत्रामध्ये बदल करणार असल्याचे गुगलने म्हटले आहे. फ्रान्समध्ये गुगलच्या विधी महासंचालक मारिया गोमरी यांनी नवे बदल फ्रान्सच्या बाहेरही लागू होतील, असे सांगितले आहे.
नेमके काय घडतेय
गुगलने असे काही तंत्र विकसित केले आहे की ऑनलाईन जाहिरात क्षेत्रात त्यांचा एकाधिकार वाढत चालला आहे. त्याचाच दुरुपयोग करीत जाहिरातींवर जास्तीचे कमशीन गुगल कमवत आहे. आणि जाहिरातींचा साधा मजकूरही गुगल स्वतः तयार करीत नाही. गुगलने आर्थिक असमतोल तयार केल्यामुळे वर्तमानपत्रांवर परिणाम होत असल्याचाही आरोप होत आहे.