पॅरिस (फ्रान्स) – संपूर्ण जगात वेगाने लसीकरण होण्यासाठी प्रयत्न सुरू असताना फ्रान्समध्ये मात्र नागरिकच लसीकरणाला विरोध करीत आहेत. लसीकरणाच्या विरोधात हजारो नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलन केले. फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रान यांनी बार, रेस्टॉरेंटमध्ये प्रवेशासाठी लस पास अनिवार्य केला होता. त्याला आता जोरदार विरोधाचा सामना करावा लागत आहे. आंदोलन करणाऱ्यांमध्ये आरोग्य सेवकांची संख्या सर्वाधिक आहे, हे विशेष.
कोरोनावर मात करण्यासाठी राष्ट्रपतींनी विविध उपाययोजनांची घोषणा केली आहे. त्यावर ज्यांना लसीकरण मान्य नाही, त्यांना लस घेण्याची जबदरस्ती करता येणार नाही, असे आरोग्यसेवक आंदोलकांचे म्हणणे आहे. लस घेण्याची जबरदस्ती करणे हे व्यक्तीस्वातंत्र्याचे उल्लंघन आहे, असेही म्हटले जात आहे.
राष्ट्रपतींच्या विरोधात संपूर्ण देशात छोट् छोट्या भागांमध्ये आंदोलक एकत्र येऊन निषेध नोंदवत आहेत. पंतप्रधान जीन कास्टेक्स यांनी मात्र लसीकरण अनिवार्य नसले तरीही कोरोनावर मात करण्याचा एकमात्र उपाय आहे, असे म्हटले आहे. लोकांच्या इच्छेचा आदर आहे. मात्र त्यांनी लस घेण्याची तयारी ठेवली पागिजे. कारण महामारीचा सामना करण्यासाठी सध्या आपल्याकडे लसीकरण हे एकमेव शस्त्र आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
एका अहवालात असे पुढे आले आहे की ६० टक्क्यांहून अधिक आरोग्यसेवक लसीकरण अनिवार्य करण्याच्या बाजुने आहेत, तसेच त्यांना लस पासचा निर्णयही मान्य आहे. एप्रिलमध्ये फ्रान्समध्ये दररोज ४२ हजारांहून अधिक रुग्ण आढळत होते. त्यानंतर जूनमध्ये ही संख्या दररोज २ हजारावर आली. मात्र आता पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढत असून दररोज ११ हजार रुग्णांमध्ये संक्रमण आढळत आहे. देशातील ५५.१ टक्के लोकांना व्हॅक्सीनचा एक डोस लागलेला आहे, तर ४४.२ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.