अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाड पासून जवळच असलेल्या दहेगांव शिवाराजवळील चोपडा यांचे कांद्याच्या खळ्याजवळ आज गुरुवारी दुपारच्या सुमारास ४ वाहनांमध्ये विचित्र स्वरूपाचा अपघात झाला. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी किंवा कोणीही जखमी झाले नाही. सिंदखेडा डेपोची बस मनमाडहून मालेगांवकडे जात असतांना या बसला मागाहून येणाऱ्या एका मालवाहू ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात धडक दिली. या धडकेमुळे ट्रक पुढील नाल्यात जाऊन अडकली यात बसच्या मागील भागाची काच फुटून नुकसान झाले. बसमधील प्रवाशांना उतरवून दुसर्या बसमधून रवाना करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान हा अपघात घडलेला असतांनाच समोरून येणार्या ट्रॅक्टरने या थांबलेल्या मालट्रकला धडक दिली. त्यात ट्रॅक्टरच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले. व यातच एक मोटरसायकलस्वारही याचवेळी येवून धडकला. पण तोही सुखरूप बचावल्याचे समजते. यात प्रथमदर्शनी ट्रक चालकाची चूक असल्याची माहिती समोर आली आहे. या विचित्र अपघाताने मनमाड – मालेगांव मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.