खासदार हेमंत गोडसे यांची माहिती
नाशिक – महानगरपालिका हद्दीतील मलजल व्यवस्थापन सुरळीत व्हावे यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना आता यश येऊ लागले आहे . महानगरपालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा प्रशासनाने तयार केलेल्या सुमारे ४०० कोटी रूपयांच्या प्रस्तावाचे मनपा प्रशासनाकडून नुकतेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्य शासनाला सादरीकरण करण्यात आले . या योजनेतंर्गत शहरातील चार मल निसारण केंद्राचे अत्याधुनिकीकरण होणार आहे . या नदीजोड संवर्धन योजनेमुळे शहरातून वाहणाऱ्या नद्या उपनद्यांची स्वच्छता होणार असून गोदावरीच्या संवर्धनासाठी असलेल्या या योजनेचा लाभ शहर प्रदुषण मुक्त होण्यासाठी होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे .
शहरातील आठ रिव्हरगेज झोनमध्ये मलनिःसारण केंद्राची स्थापित क्षमता ३६० एमएलडीइतकी आहे . यापूर्वी उभारलेले मलनि : सारण केंद्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेले असले तरी अलीकडे राज्य प्रदुषण महामंडळामार्फत प्रक्रियेनंतर सोडण्यात येणाऱ्या मलजलाच्या निकषात कडक बदल करण्यात आल्याने शहरातील मलनि : सारण केंद्राचे आधुनिकरण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे . केंद्राच्या नदी संवर्धन योजनेतून शहरातील मलनि : सारण केंद्राच्या आधुनिकीकरण करणे शक्य होणार असल्याने या योजनेत नाशिक महानगरपालिकेचा समावेश व्हावा आणि मलनि सारण केंद्राचे आधुनिकीकरणासाठी केंद्राने निधी द्यावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खासदार गोडसे यांचे सातत्याने प्रयत्नशील आहेत . यातूनच मनपाने तयार केलेला डीपीआर मागील वर्षी राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता .
महानगरपालिकेने राज्य सरकारचा सादर केलेल्या प्रस्ताव पर्यटन विभागाच्या सेक्रेटरी मनीषा वर्मा यांनी पुढील कारवाईसाठी जॉईन सेक्रेटरी सूर्यकांत निकम यांच्याकडे पाठविला होता . सदर प्रस्तावाची लवकरात लवकर छाननी करून मनपा प्रशासनाकडून सादरीकरण करून यावे यासाठी खा . गोडसे यांनी वेळोवेळी मंत्रालयात जात सचिव मनीषा वर्मा आणि सहसचिव सूर्यकांत निकम यांच्याकडे सततचा पाठपुरावा केला . यानंतर निकम यांनी प्रस्तावाची पूर्ण छाननी करून नुकतेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सादरीकरण अभ्यासले व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या बैठकित मनपा आयुक्त रमेश पवार, शहर अभियंता शिवकुमार वंजारी , सार्वजनिक आरोग्य अभियंत्रीकी विभागाचे शिवाजी चव्हाणके तर मंत्रालयातील सुर्यकांत निकम , अर्चना परशुरामे आदी सहभागी झाले होते . मनपाच्या सादरीकरणावर निकम यांनी समाधान व्यक्त केले . बैठकीचे इतिवृत्तही तयार झाले आहेत. प्रस्तावाविषयी किरकोळ पूर्तता करणे बाकी असून पूर्तता होताच सदर प्रस्ताव लगेचच मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.