पुणे – केंद्र सरकारकडून सन 2021-2022 या आर्थिक वर्षाकरीता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना घरपोच आहारातंर्गत फोर्टिफाईड तांदळाचे वाटप करण्यात येत आहे. फोर्टिफाईड तांदूळ हा नियमित तांदळापेक्षा थोडासा पिवळसर असून या तांदळामध्ये फोर्टिफाईड तांदूळ व नियमित तांदळाचे प्रमाण 1:100 असे आहे. म्हणजेच केलेल्या तांदळामध्ये फोर्टिफाईड तांदळाचे प्रमाण 1 किलोमध्ये 10 ग्रॅम या प्रमाणात असते.
बालकांच्या आहारामधील सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता भरुन काढण्याकरिता फोर्टिफाईड तांदूळ देण्यात येतो. हा तांदुळ पोषक घटकांचा वापर करुन बनविण्यात आला असून या तांदळामध्ये आर्यन, फोरीक ॲसिड, व्हिटॅमिन 312, झिंक, व्हिटॅमिन बी-1, बी-2,बी-5,बी-6 या पोषक घटकामुळे बालकांना अधिकची पोषकतत्वे या तांदळातून मिळतात.
प्रक्रियायुक्त फोर्टिफाइड तांदळाचे वजन नियमित तांदळापेक्षा कमी असते. त्यामुळे हा तांदुळ पाण्यामध्ये वर तरंगताना दिसून येतो. हा तांदूळ पिवळसर रंगाचा दिसत असेल आणि पाण्यामध्ये तांदूळ भिजत घातल्यानंतर त्यापैकी काही तांदूळ पाण्यावर तरंगत असल्याचे निदर्शनास आल्यास गैरसमज करू नयेत. फोर्टिफाइड तांदूळ नियमित पद्धतीने शिजवावा. यासाठी कोणत्याही प्रकारची वेगळी कार्यपध्दती अवलंबण्याची आवश्यकता नाही. फोर्टिफाइड तांदळाबाबत अधिकची माहिती केंद्र शासनाच्या फूड सेफ्टी ॲन्ड स्टॅन्डर्ड ऑफ इंडिया (एफएसएसऐआय) https://ffrc.fssai.gov.in/commodity च्या संकेतस्थळवर उपलब्ध आहे. असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि) के. एफ. राठोड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.