विशेष प्रतिनिधी, पुणे
कोरोनामुक्त झालेले काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांचे अखेर निधन झाले आहे. कालच त्यांची प्रकृती अधिक खालावली होती. त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु होता. त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. सातव हे राहुल गांधी यांचे विश्वासू नेते आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी दिले आहे.
सातव यांची १९ दिवसाच्या उपचारानंतर कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाले होते. पण, त्यांची अचानक तब्येत खालावली त्यांनंतर त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले. जहांगीर रुग्णालयातील डॅाक्टरांनी त्यांच्या तब्येतीविषयी सांगितले की, सातव यांची तब्येत सुधारत आहे. त्यांना काही दिवसात डिस्चार्ज देण्यात येईल. ते व्हेंटिलेटर शिवाय देखील श्वास घेऊ शकतात. मात्र, त्यांची ही लढाई अपयशी ठरली.
१९ एप्रिलला राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली. २२ तारखेला त्यांची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यांनंतर १९ दिवसाच्या उपचारानंतर १० मे रोजी त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार होता. पण, त्यात त्यांची तब्येत पुन्हा खालावली.