मुंबई – मनी लॉन्ड्रींग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगातच जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. या प्रकरणाची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीने देशमुख यांना वारंवार नोटिसा बजावल्या. त्यानंतर देशमुख हे काल (१ नोव्हेंबर) ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. ईडीने त्यांची तब्बल १३ तास चौकशी केली. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना अटक केली. आज त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. ईडीने जोरदार युक्तीवाद करीत कोठडीची मागणी केली. ती न्यायालयाने मंजूर केली. अखेर देशमुख यांना ६ नोव्हेंबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, कोठडी मिळणे हा देशमुखांसाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
https://twitter.com/LiveLawIndia/status/1455487827211210765