नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भाजपने एनडीएकडून सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर आज इंडिया आघाडी व विरोधी पक्षाने सुध्दा आपला उमेदवार जाहीर केला. या पदासाठी माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व शरद पवार यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.
ही घोषणा झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की, २१ ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. बुधवारी सर्व विरोधी पक्षांचे खासदारांची दुपारी १ वाजता सेंट्रल हॉलमध्ये बैठक होणार आहेत. या घोषणेनंतर आरएसपी खासदार एन.के. प्रेमचंद्रन म्हणाले की, आम्ही जनतेला एक मजबूत संदेश देऊ इच्छितो की संपूर्ण विरोधी पक्ष एक आहे. या उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर लगेचच, वायएसआर काँग्रेस आणि आपने या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. ही एनडीए आणि इंडिया अलायन्समधील राजकीय आणि वैचारिक स्पर्धा आहे.
तर काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल म्हणाले की, ही एक वैचारिक लढाई आहे. देशाला जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागील कारण माहित नाही… एकीकडे, आपण संवैधानिक अधिकारांसाठी लढत आहोत… हा देश मोठ्या वैचारिक समस्यांना तोंड देत आहे….आपण संविधान वाचवण्यासाठी लढत आहोत.
बी. सुदर्शन रेड्डी यांची अशी आहे कारकिर्द
बी. सुदर्शन रेड्डी यांचा जन्म ८ जुलै १९४६ रोजी झाला. त्यांनी बीए आणि एलएलबीची पदवी प्राप्त केली आहे. २७ डिसेंबर १९७१ रोजी आंध्र प्रदेश बार कौन्सिल हैदराबाद येथे वकील म्हणून त्यांनी कारर्किदीला सुरुवात केली. १९८८-९० दरम्यान त्यांनी उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम केले. त्यानंतर १९९० मध्ये सहा महिन्यांसाठी केंद्र सरकारचे वकील म्हणून सेवा केली. २ मे १९९५ रोजी त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. ५ डिसेंबर रोजी त्यांना गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनवण्यात आले. १२ जानेवारी २००७ रोजी त्यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. ८ जुलै २०११ रोजी ते निवृत्त झाले.