इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशात भ्रष्टाचार कमी झाल्याचा दावा केला जात असला तरी, सरकारी अधिकाऱ्यांकडे दररोज कोट्यवधींची अवैध मालमत्ता सापडत असल्याने हा दावा फोल ठरला आहे. मिळकतीपेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याप्रकरणी बिहारमध्ये एका वन विभागाच्या अधिकाऱ्याला अटक केली आहे.
बिहारमधील सुपौल येथील वन विभागाचे अधिकारी सुनील कुमार शरण यांच्या अडचणी वाढल्या आहेत. देखरेख तपास संस्थेद्वारे गुरुवारी शरण यांचे आणि त्यांच्या पत्नीचे बँकेचे लॉकर उघडण्यात आले. लॉकरमधून ४० लाख रुपयांहून अधिकचे सोने आणि खरेदी केलेल्या पावत्या आढळल्या आहेत. त्यांची कोट्यवधीची स्थावर मालमत्ता असल्याचा खुलासाही या छापेमारीदरम्यान झाला आहे.
शेखपुरा येखील बरबिघामधील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत सुनील कुमार शरण आणि त्यांची पत्नी सुधा शरण यांच्या नावावर लॉकर आहे. न्यायालयाकडून सर्च वॉरंट मिळाल्यानंतर हे लॉकर उघडण्यात आले. देखरेख तपास संस्थेच्या माहितीनुसार, लॉकरमध्ये ५१८ ग्रॅम सोन्याचे दागिने आढळले. यामध्ये सोन्याच्या १० नाण्यांचा समावेश आहे. या सोन्या-नाण्याची एकूण किंमत ४०,२४,५६० रुपये इतकी आहे. तसेच ३७० ग्रॅम चांदीसुद्धा हस्तगत करण्यात आली आहे.
वन विभागीय अधिकारी सुनील कुमार शरण यांच्यावर मिळकतीपेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास संस्थेद्वारे १ आणि २ मे रोजी त्यांच्या ठिकाणांवर छापे मारले होते. या दरम्यान त्यांच्या पाटण्यापासून ते पुण्यापर्यंत अनेक स्थावर मालमत्ता आढळल्या होत्या.
तसेच नालंदा आणि शेखपुरामध्येसुद्धा जमिनीची कागदपत्रे मिळाली होती. या छापेमारीदरम्यान स्थावर मालमत्तेशिवाय १४ बँकेचे खाते, ४,१२,००० रोख, ५,८४,००० रुपयांचे विविध दागिने, विविध विमा कंपन्यांमध्ये २३,३८,००० रुपयांची गुंतवणूक केल्याचे पुरावे मिळाले होते.