मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वन विभागामार्फत आगामी काळात होणाऱ्या प्रत्येक कामांबाबत जिओ टॅगिंग करणे आवश्यक असल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच प्रत्येक व्याघ्र प्रकल्पाने पर्यटकाना आकर्षित करण्यासाठी फेसबुक पेज सुरु करावे, अशी सूचना यावेळी केली.
सांगली येथील चांदोली अभयारण्य आणि दत्त टेकडी विकसित करण्याबाबतची बैठक आज वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार जयंत पाटील, आमदार मानसिंहराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, वन विभागांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधी आणि तेथील नागरिकांना होणे गरजेचे आहे. त्यामुळे वन विभागातर्फे करण्यात येणाऱ्या कामाचे टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात येईल.
सांगली जिल्ह्यातील चांदोली अभयारण्य येथे झोलंबी पठार आहे. कास पठार सारखे हे पठार आणखी विकसित कसे करता येईल, जेणेकरुन येथे अधिक पर्यटक येऊ शकतील याचा अभ्यास करावा. चांदोली अभयारण्यात येत्या काळात वाघाची जोडी सोडता येऊ शकेल का हे सुद्धा तपासून घ्यावे, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
आगामी काळात येथे क्रोकोडाइल पार्क, सर्प उद्यान, बिबट सफारी, मत्स्यालय यासारखे प्रकल्प उभे करताना याबाबतचा अभ्यास करावा. चांदोली अभयारण्य परिसरास कुंपण कसे घालता येईल यासाठी निधीचे नियोजन करुन याबाबत विस्तृत नियोजन करावे, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
इस्लामपूर येथील दत्त टेकडी विकसित करण्याच्या कामाला गती द्यावी. यासाठी येत्या दोन महिन्यांत याबाबतचा आराखडा तयार करुन स्थानिक लोकप्रतिनिधींना दाखवून सादर करावा. वन विभागामार्फत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर दत्त टेकडी विकसित करण्याचे काम सुरु करावे. आगामी दत्तजयंतीपर्यंत हे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
Forest Department Work Compulsion Minister