अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदूर रेल्वे तालुक्यातील बसलापूर येथील वनक्षेत्रामध्ये वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुठलीही तांत्रिक मदत न घेता स्वयंस्फूर्तीने एका सुंदर तलावाची निर्मिती केली आहे. या तलावामुळे भूजलपातळीत सुधारणा होऊन वन्यप्राण्यांना जंगलातच पाणी उपलब्ध झाले आहे.
या तलावाचे जलपूजन लवकरच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तलावाच्या कामाबाबत सादरीकरण नुकतेच पालकमंत्र्यांसमक्ष केले.
वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उभारलेल्या या वन तलावामुळे वनांचे पर्यावरण सुधारण्यास मदत होणार आहे.यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तांत्रिक मदत न घेता स्वतः झटून हे काम पूर्ण केले, हे कौतुकास्पद आहे. जल व वन व्यवस्थापनाचे हे काम सर्वांसाठी आदर्श ठरणारे आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
320 मीटर लांबीचा तलाव
हा तलाव वनविभाग कर्मचारी व अधिकारी यांनी स्वतः सर्वेक्षणातून अंदाजपत्रक तयार करून, तसेच अभियंत्यांचीही तांत्रिक मदत न घेता स्वतः बांधला आहे. तलावाच्या भिंतीची लांबी 320 मीटर आहे. तलावात मोठ्या प्रमाणावर जलसाठा असून त्याची खोली 20 फूट आहे.
जंगलात पाणी उपलब्ध नसेल तर वन्यप्राणी पाण्याच्या शोधात शेते किंवा गावाजवळील पाणीसाठ्याकडे वळतात. यामुळे शेतीचे नुकसान संभवते. तथापि, जंगलातच मोठा पाणीसाठा उपलब्ध झाल्याने वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय झाली आहे. त्यामुळे या वनातील वन्यप्राण्यांचा जंगलाबाहेरील वावर थांबला आहे. त्याचप्रमाणे, वनानजिकच्या शेती क्षेत्रातही भूजलपातळी सुधारली आहे.
वनांचे पर्यावरण, निसर्गाचा समतोल साधला जाण्याबरोबरच भूजल पातळी वाढल्याने नजिकच्या शेतीलाही फायदा झाला आहे, अशी माहिती तत्कालीन सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांनी दिली. तलावाचे अंदाजपत्रक व तलाव बांधकाम श्री. कविटकर यांच्या मार्गदर्शनखाली वनक्षेत्रपाळ आशिष कोकाटे, वनरक्षक अक्षरे व वनसेवक अजय चौधरी यांनी केले आहे.