नवी दिल्ली – भारत सध्या कोरोनाची लाट आणि लशींचा तुटवडा या दोन्ही समस्यांना सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर पाच दिवसीय दौ-यावर अमेरिकेला पोहोचले आहेत. या दरम्यान ते न्यूयॉर्कमध्ये बायडेन प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्यांशी भारत-अमेरिकेदरम्यानच्या कोरोना सहकार्याबाबत चर्चा करणार आहेत.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताच्या प्रवेशानंतर न्यूयॉर्कच्या पहिल्या दौर्यादरम्यान संयुक्त राष्ट्रात भारताचे राजदूत टी. एस.तिरुमूर्ती यांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री जयशंकर यांचे स्वागत केले. १ जानेवारी २०२१ मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रवेश केल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.
२८ मेपर्यंतच्या दौर्यादरम्यान एस. जयशंकर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांची भेट घेण्याची शक्यता आहे. नंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्याशी चर्चा करणार आहेत. भारत-अमेरिकेदरम्यानच्या द्वि पक्षीय संबंधाबाबत चर्चा करण्यासाठी कॅबिनेटचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकार्यांचीही भेट घेणार आहेत. भारत आणि अमेरिकेदरम्यान आर्थिक आणि कोविडबाबत सहकार्यावर व्यापारी मंचांशी चर्चा करणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली आहे.
लशींचे उत्पादन करणार्या विविध अमेरिकी कंपन्यांसोबत भारताची चर्चा सुरू आहे. तसेच लशींची खरेदी आणि त्यांचे उत्पादन करण्याबाबत प्रयत्न करत आहे. अमेरिकी नेतृत्व आणि इतर हितचिंतकांशी होणार्या चर्चेत लशींची खरेदी हाच प्रमुख मुद्दा असण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/ANI/status/1396639356224299011?s=20